लख्वीला डांबून ठेवणे बेकायदा
By admin | Published: March 13, 2015 11:29 PM2015-03-13T23:29:53+5:302015-03-13T23:30:15+5:30
२००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेशन कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याला तुरुंगात डांबून ठेवणे बेकायदा
इस्लामाबाद : २००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेशन कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याला तुरुंगात डांबून ठेवणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करत त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश येथील हायकोर्टाने शुक्रवारी सरकारला दिले. याआधीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने या प्रकरणी आपला आदेश राखून ठेवला होता.
न्यायाधीश नुरुल हक कुरेशी यांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी लख्वीला तुरुंगात डांबून ठेवण्याचा आदेश ‘बेकायदा’ ठरवत त्याच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले.
लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले की, माझ्या अशिलाच्या सुटकेचा आदेश रावळपिंडीच्या अडियाला तुरुंग प्रशासनाला सादर करणार आहे. आम्हाला अद्याप न्यायालयाचा हा आदेश प्राप्त झाला नाही. याप्रकरणी ५ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाक सरकारने लख्वीवरील सर्व आरोपांची सविस्तर यादीच न्यायालयास सादर केली होती. मुंबई हल्ल्यासोबतच एका अफगाण नागरिकाचे अपहरण केल्याचा आरोपही सरकारने केला होता. मात्र, लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सरकार आपल्या अशिलाविरोधात आणखी एक गुन्हा नोंदविण्याचा कट रचत असल्याचा युक्तिवाद न्यायालयापुढे केला. पाकच्या गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, सरकार लख्वीला अन्य जनसुरक्षा आदेशांतर्गत ताब्यात घेऊ शकते. कारण न्यायालयाने अगोदरच आपल्या पूर्वपरवानगीशिवाय लख्वीविरोधात कोणतेही प्रकरण दाखल करून घेण्यावर बंदी घातली होती. सार्वजनिक सुरक्षा कायम राखण्याच्या आदेशांतर्गत याच आठवड्यात ३० दिवसांच्या अटकेचा आदेशही हायकोर्टाने निलंबित केला आहे. (वृत्तसंस्था)