लोक काय म्हणतात यापेक्षा बाळाचं पोट भरणं महत्त्वाचं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 08:02 PM2017-07-31T20:02:42+5:302017-07-31T20:06:33+5:30
बिश्केक, दि.31 जुलै- 1ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील खासदार लॅरिसा वाटर्स यांनी संसदेचे कामकाज सुरु असताना बाळाला स्तनपान करु दिले होते. दुर्देवाने तिच्या या कृत्याकडे एक सहज घटना म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकाच झाली होती.
स्तनपान आठवड्याच्या पार्श्वभूमीवर अशीच काहीशी घटना किरगिझिस्तानमध्ये घडली आहे. किरगिझिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी आलिया शागियेवाने आपल्या बाळाला दूध पाजताना काढलेले फोटो प्रसिद्ध केले होते. माझ्या बाळाला गरज असेल तेथे आणि तेव्हा मी त्याला दूध पाजेन अशी कॅप्शनही तिने त्या फोटोंबरोबर प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तिच्यावर जबरदस्त टीका करण्यात आली. राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने असं काही करणं लोकांना आजिबात रुचलं नाही. त्यांनी तिला ते फोटो काढायला लावले.
सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेले स्तनपानाचे फोटो आलियाने मागे घेतले असले तरी तिची मतं ठाम आहेत. 'माझे शरीराकडे अश्लील म्हणून पाहण्याची काय गरज आहे? बाळाला दूध पाजणं हे त्याचे पोट भरण्यासाठी होतं. त्याला सेक्शुअलाइज करण्याची गरज नाही.' आलियाने फोटो प्रसिद्ध केल्यावर तिचे बाबा आणि किरगिझिस्तानचे अध्यक्ष अल्माझबेक आत्माबायेव व तिच्या आईनेही नापसंती व्यक्त केली होती. आलिया म्हणते, त्यांची परिस्थिती समजण्यासारखी आहे. आमची पिढी त्यांच्यापेक्षा कमी कर्मठ आहे. बाळाचं पोट भरणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, लोक काय म्हणतात हे मह्त्त्वाचं नाही.
आलियाप्रमाणे मध्यतंरी ब्राझीलियन खासदारही संसदेमध्ये भाषणाच्या वेळेस बाळाला स्तनपान करत असल्याचे छायाचित्र जगभर प्रसिद्ध झाले होते. दुर्देवाने याकडे एक सहज घटना किंवा बाळाच्या दिनक्रमाचा एक भाग असे न पाहता त्याच्याकडे अश्लील, अनैतिक असे लेबल लावले जाते.