संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे जरूरी

By Admin | Published: September 26, 2015 02:55 AM2015-09-26T02:55:33+5:302015-09-26T02:55:33+5:30

प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची

It is important to reform the UN Security Council | संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे जरूरी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे जरूरी

googlenewsNext

न्यूयॉर्क : प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची विश्वसनीयता आणि प्रासंगिकता कायम राहावी म्हणून सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा करणे जरूरी असल्याचे आग्रही प्रतिपादन युनोच्या आमसभेत केले.
विकसित देश विकास आणि हवामानातील बदलाबाबत स्वार्थाचा विचार न करता आपापली वित्तीय जबाबदारी पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अलिप्त राहून या आव्हानांचा मुकाबला करणे शक्य नाही. त्यांनी महात्मा गांधी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांचाही भाषणात उल्लेख केला.
जगातून दारिद्र्याचे निर्मूलन करण्याची गरज अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, जगाच्या पाठीवर १.३ अब्ज लोकांना दारिद्र्यात जीवन जगावे लागत आहे. भारताने दारिद्र्य निर्मूलन, सर्वसमावेशी विकास, महिला सशक्तीकरण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योजलेल्या उपाययोजनांचाही पंतप्रधान मोदी यांनी भाषणात उल्लेख केला.
‘सर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरायम:, सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चिद दु:ख माप्नुयात..’ या शांतीमंत्राने अवघ्या विश्वासाठी मंगलमय कामना करीत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा शेवट केला.
दरम्यान, महत्त्वाकांक्षी टिकाऊ विकासाच्या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजुरी दिली. येत्या १५ वर्षांत दारिद्र्य आणि उपासमार हद्दपार करून लैंगिक समानतेसह सर्वांना आदरासह संधी उपलब्ध करणे, हा या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा उद्देश आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान मोदी यांच्या समवेत जगभरातील नेते उपस्थित होते.
येत्या १५ वर्षांत १७ महत्त्वाकांक्षी उद्देशांची पूर्तता करण्यात येणार असून यात दारिद्र्य निर्मूलन, उपासमार संपुष्टात आणण्यासह उच्च शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पेयजल आणि स्वच्छतेचा समावेश आहे.

Web Title: It is important to reform the UN Security Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.