ढाका हल्ल्याशी इसिसचा संबंध नाही, सर्व हल्लेखोर स्थानिक
By admin | Published: July 3, 2016 11:30 AM2016-07-03T11:30:11+5:302016-07-03T11:36:10+5:30
ढाक्यामध्ये हॉटेलवर हल्ला करणारे दहशतवादी इसिसचे नसून, बांगलादेशातीलच आहेत अशी माहिती रविवारी बांगलादेश सरकारमधील मंत्र्याने दिली
Next
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ३ - ढाक्यामध्ये हॉटेलवर हल्ला करणारे दहशतवादी इसिसचे नसून, बांगलादेशातीलच आहेत अशी माहिती रविवारी बांगलादेश सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहात हल्ला करुन वीस परदेशी नागरीकांची हत्या केली. मृतांमध्ये एका भारतीय तरुणीचाही समावेश आहे.
जमायतुल मुजाहिदीन या बांगलादेशातच वाढलेल्या अतिरेकी संघटनेने हा हल्ला केला अशी माहिती गृहमंत्री असादुझामान खान यांनी दिली. दशकभरापासून बांगलादेशमध्ये या अतिरेकी संघटनेवर बंदी आहे. इस्लामिक स्टेटशी (इसिस) या संघटनेचा काहीही संबंध नाही असे खान यांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री सुरु झालेले हे ओलीस नाटय शनिवारी ११ तासानंतर संपले. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिस बांगलादेशमध्ये सक्रीय नसल्याचा सुरुवातीपासून बांगलादेश सरकारचा दावा होता.
पोलिसांनी सहाही हल्लेखोरांची नावे आणि फोटो प्रसिद्ध केले आहेत. सातव्या अतिरेक्याला अटक केली असून, बांगलादेशी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. सर्व हल्लेखोर सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबातील होते असे खान यांनी सांगितले.