तब्बल २० वर्षे शोधले, तेव्हा ‘त्या’ भेटल्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:18 AM2022-09-30T10:18:21+5:302022-09-30T10:19:15+5:30

.... त्यांच्या कादंबऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळत असताना या लेखकाला इंग्रजी लिहायला, वाचायला शिकवणाऱ्या आपल्या एका शिक्षिकेची आठवण येत होती.

It took 20 years for this afghan author to reunite with the teacher who changed his life | तब्बल २० वर्षे शोधले, तेव्हा ‘त्या’ भेटल्या !

तब्बल २० वर्षे शोधले, तेव्हा ‘त्या’ भेटल्या !

googlenewsNext

अफगाण लेखक जामिल जान कोचाई. त्यांच्या कादंबऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळत असताना या लेखकाला इंग्रजी लिहायला, वाचायला शिकवणाऱ्या आपल्या एका शिक्षिकेची आठवण येत होती. त्या शिक्षिकेला भेटून कृतज्ञता व्यक्त करण्याची अपार ओढ त्यांना लागली.  जामिलनं २० वर्षे त्या शिक्षिकेचा शोध घेतला आणि अखेर ऑगस्ट २०२२ मध्ये त्याच्या  पुस्तकाच्या जाहीर वाचनाच्या कार्यक्रमाप्रसंगी या शिक्षिकेची भेट झाली.  एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये शोभणारा हा प्रसंग.

जामिलचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर इथल्या निर्वासितांच्या छावणीत झाला. त्याचे आईवडील अफगाणिस्तानमधले. कामाच्या निमित्तानं त्यांचं कुटुंब काही काळ कॅलिफोर्नियातील वेस्ट सॅक्रॅमेंटो येथे स्थायिक होतं. तेव्हा जामिल केवळ एक वर्षाचा होता. घरात पुश्तू आणि फारसी  भाषा बोलल्या जात. इंग्रजी येत नव्हतं म्हणून छोट्या  जामिलची  शाळेत खूपच अडचण होत होती. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आईवडिलांसोबत अफगाणिस्तानात आला. सुट्ट्यांमध्ये जामिलची पुश्तू सुधारली; पण पहिलीत आपण इंग्रजीत काय शिकलो हे मात्र तो साफ विसरला आणि  दुसरीमध्ये अभ्यासात मागे पडत गेला. त्याच वर्षी वेस्ट सॅक्रॅमेंटो इथल्या ‘ॲलिस नाॅर्मन एलिमेण्ट्री स्कूल’मध्ये सुसान लंग या जामिलच्या शिक्षिका होत्या. त्यांनी जामिलचं इंग्रजी सुधारण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. हळूहळू जामिलला इंग्रजी भाषेत रस निर्माण झाला. 

त्याच वर्षी जामिलचं कुटुंब पुन्हा स्थलांतरित झालं आणि जामिलचा लंग यांच्याशी असलेला संपर्क तुटला. पुढे जामिल वेगवेगळ्या ठिकाणी राहून शिकत गेला. पुढे लेखक म्हणून नावलौकिक झाल्यावर जामिलला लंग टीचरची खूप आठवण येत होती. त्यांना भेटून तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहात, हे त्यांना सांगायचं होतं.  जामिलला लंग यांचं पहिलं नाव काही केल्या आठवत नव्हतं.  गुगलवरही हाती काहीच लागलं नाही.  शेवटी २०१९ मध्ये ‘लिटररी हब’ या वेबसाइटवर लिहिलेल्या लेखात जामिलने त्याच्या लंग टीचरचा उल्लेख केला. त्यांना भेटायला मी किती तळमळतो आहे, हेही लिहिलं. हा लेख लंग यांच्यावर उपचार करणाऱ्या मेंदुविकार तज्ज्ञांनी वाचला. या लेखातल्या लंग म्हणजे आपल्या पेशण्ट लंग असतील, अशी शंका आल्यावर त्यांनी सहज चौकशी केली, तर लंग यांनाही इंग्रजीमुळे अडखळलेला जामिल आणि त्याची छोट्या वयातली प्रतिभा आठवली.  मग सुसान लंग यांच्या पतीने- ॲलन लंग यांनी जामिलला फेसबुकवर मेसेज टाकला. पण जामिलच्या नजरेतून तो सुटला.  

अखेर २०२० मधील उन्हाळ्यात जामिलने तो मेसेज वाचला. त्याने मेसेजमधल्या नंबरवर लगोलग फोन लावला, तेव्हा अमेरिकेत मध्यरात्र झाली होती. जामिल सांगतो, त्या रात्री आम्ही फोनवर खूप बोललो, हसलो आणि रडलोही. ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची रात्र होती. भेटायचं ठरलं, पण कोविड  निर्बंधामुळे ते शक्य झालं नाही. पुढे  अफगाणिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ झाली आणि लंग आणि जामिल यांचं प्रत्यक्ष भेटणं राहूनच गेलं.

- शेवटी १३ ऑगस्ट २०२२ हा दिवस उजाडला! ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’त जामिलच्या ‘हाजी होटक ॲण्ड अदर स्टोरीज’ या पुस्तकाच्या काही भागांच्या वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाची माहिती लंग दाम्पत्याला मिळाली, तेही कार्यक्रमाला आले. 

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ॲलन लंग जामिलला जाऊन भेटले. आपली ओळख दिली आणि आपल्यासोबत सुसान लंगही आल्या असून त्या प्रेक्षकांमध्ये बसल्याचं  सांगितलं.  प्रेक्षकांमध्ये ॲलन यांच्या मागे बसलेल्या सुसान लंग यांना पाहून जामिलला अत्यानंद झाला. हा आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असल्याचं जामिल सांगतो. कार्यक्रम संपल्यानंतर जामिलने अत्यानंदानं सुसान लंग यांना घट्ट मिठी मारली... आणि जामिलचं २० वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.  

कोण आहे जामिल जान कोचाई? 
हा ३० वर्षांचा तरुण अफगाण लेखक . ‘‘९९ नाइट्स इन लोगार’’ ही जामिलची पहिली कादंबरी. २०२० मध्ये पेन/हेमिंग्वे पुरस्कारासाठी या कादंबरीची निवड करण्यात आली. ‘‘हाजी होटक ॲण्ड अदर स्टोरीज’’ हे दुसरं पुस्तक आहे.  दोन पुस्तकांमुळेच या तरुण अफगाण लेखकानं जगभरात आपली ओळख निर्माण केली.

Web Title: It took 20 years for this afghan author to reunite with the teacher who changed his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.