इराणने ज्याला दिली इस्राइलच्या हेरगिरीची जबाबदारी तोच निघाला मोसादचा एजंट, माजी राष्ट्रपतींनी केला धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:31 IST2024-10-01T19:29:25+5:302024-10-01T19:31:06+5:30
Isrial Iran News: इराणचे माजी राष्ट्रपती मोहम्मद अहमदीनिजाद यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. इराणने इस्राइलच्या हेरगिरीचा सामना करण्यासाठी तैनात केलेल्या एका सिक्रेट सर्व्हिस युनिटचा प्रमुख स्वत:च इस्राइलचा गुप्तहेर होता, असा दावा अहमदीनिजाद यांनी केला आहे.

इराणने ज्याला दिली इस्राइलच्या हेरगिरीची जबाबदारी तोच निघाला मोसादचा एजंट, माजी राष्ट्रपतींनी केला धक्कादायक दावा
इराणचे माजी राष्ट्रपती मोहम्मद अहमदीनिजाद यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. इराणने इस्राइलच्या हेरगिरीचा सामना करण्यासाठी तैनात केलेल्या एका सिक्रेट सर्व्हिस युनिटचा प्रमुख स्वत:च इस्राइलचा गुप्तहेर होता, असा दावा अहमदीनिजाद यांनी केला आहे. अहमदीनिजाद यांनी एका मुलाखतीमधून हा सनसनाटी दावा केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अहमदीनिजाद यांनी सांगितले की, इराणमध्ये इस्राइलच्या गोपनीय मोहीमांचा सामना करण्यासाठी उत्तरदायी असलेला इराणमधील सर्वात वरिष्ठ व्यक्ती ही स्वत:च मोसादची एजंट होती, हे २०२१ पर्यंत स्पष्ट झाले होते. इस्राइलने इराणमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मोहिमा पूर्णत्वास नेल्या आहेत. त्यांना हवी ती माहिती ते सहजपणे मिळवू शकत होते, असा दावाही अहमदीनिजाद यांनी केला.
अहमदीनिजाद पुढे म्हणाले की, इराणच्या गुप्तचर विभागामधील २० अतिरिक्त एजंट हे मोसादसाठी काम करत होते. त्यांच्याकडेच इस्राइलच्या हेरगिरीवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या कथित डबल एजंट्सनी इराणच्या अणुकार्यक्रमाची माहिती इस्राइलला पुरवली. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाच्या कागदपत्रांच्या झालेल्या चोरीसही हेच डबल एजंट जबाबदार होते. तसेच त्यांनी इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांची हत्याही घडवून आणली होती, असा दावाही अहमदीनिजाद यांनी केला. दरम्यान, इराणच्या या माजी राष्ट्रपतींचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.