भारत-पाक चर्चा रद्द होणे दुर्भाग्यपूर्ण - अमेरिका
By admin | Published: August 19, 2014 10:04 AM2014-08-19T10:04:41+5:302014-08-19T12:12:22+5:30
पाकिस्तानसोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १९ - पाकिस्तानसोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. फुटिरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात हे कडक पाऊल उचलले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मारी हार्फ यांच्या म्हणण्यानुसार, भारत व पाकिस्तानदरम्यान होणारी चर्चा रद्द होणे दुर्दैवी आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. अमेरिकेकडून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी नेहमीच मदत करण्यात येईल, असेही आमचे दोन्ही देशांना सांगणे असल्याचे, हार्फ म्हणाले. तसेच काश्मीर मुद्याबाबत अमेरिकेची भूमिका बदललेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिका-याने सोमवारी एका विघटनवाद्यासोबत बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला ‘भारत किंवा विघटनवादी यापैकी एकाचीच निवड करावी लागेल’ या शब्दात विदेश सचिव सुजाता सिंग यांनी भारताची नाराजी कळवली. २५ ऑगस्ट रोजी इस्लामाबाद येथे दोन देशांदरम्यान सचिव स्तरावरील चर्चा होणार होती. सध्याच्या वातावरणात या चर्चेचा उद्देश साध्य होणार नाही, असेही भारताने स्पष्ट केले.
भारत व पाकिस्तान दोघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काश्मिर प्रश्नावर दोन देशांमध्ये चर्चा होणार होती. मात्र, पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी हुरियतच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं.
त्यामुळे भारताने पाकिस्तानशी चर्चा न करण्याची भूमिका घेत पाकिस्तानला 'एकतर भारताशी चर्चा करा नाहीतर फुटीरतावाद्यांशी' असा खणखणीत इशारा दिला.