आयपीएलच्या पैशावर आता सौदीचाही डोळा; पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 09:09 AM2023-11-16T09:09:40+5:302023-11-16T09:14:02+5:30

‘आयपीएल’नंतर क्रिकेटमध्ये पैशाची अक्षरश: गंगाच आणली आहे. आयपीएलची हीच पैशांची गंगा आता सौदी आपल्या देशात वळवू पाहतो आहे.

It will not be surprising if Saudi Arabia's stake in the IPL increases in the coming years | आयपीएलच्या पैशावर आता सौदीचाही डोळा; पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार

आयपीएलच्या पैशावर आता सौदीचाही डोळा; पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार

क्रिकेट हा खेळ तसा जगातल्या अतिशय मोजक्या देशांमध्ये खेळला जातो; पण तरीही क्रिकेटनं अख्ख्या जगाला वेड लावलं आहे. हा खेळ म्हणून भारतीय उपखंडातील लोकांसाठी जीव की प्राण असला आणि त्यासाठी काहीही करायची चाहत्यांची तयारी असली, तरी इतर जगाच्या दृष्टीनं मात्र या खेळापेक्षा यातल्या पैशावर त्यांचा जास्त डोळा आहे. या खेळात जो महामूर पैसा आहे, त्याचा सगळ्या जगालाच अचंबा आहे त्यामुळे हळूहळू अनेक देश आता या ना त्या मार्गे क्रिकेटकडे वळू लागले आहेत.या यादीत आता ताजं नाव आहे, ते म्हणजे सौदी अरेबिया. 

ज्या सौदी अरेबियात अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मागास निर्णयांची परंपरा सुरू होती, तोच सौदी अरेबिया आता आपल्या प्रागतिक विचारांनी जगात आपली प्रतिमा उंचाऊ पाहतो आहे. महिलांनी घराबाहेर पडणं असो, त्यांनी कार चालवणं असो, नोकरी करणं असो.. पुरुषांच्या बरोबरीनं अनेक क्षेत्रात आता महिलाही आपली कर्तबगारी दाखवू लागल्या आहेत. पण जगाचे आणि भारताचे डोळे आता चमकले आहेत, ते सौदी अरेबिया क्रिकेटच्या क्षेत्रात नव्यानं जी उमेदवारी करू पाहात आहे, त्यामुळे इनमिन दोन हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके देश फक्त क्रिकेट खेळतात; पण जगातल्या अतिशय बलाढ्य अशा खेळांच्या संघटनांना लाजवेल इतका पैसा क्रिकेटमध्ये आहे. याच पैशानं आपलंही उखळ पांढरं करुन घेण्याची अहमहमिका आता अनेक देशांमध्ये लागली आहे. ‘आयपीएल’नंतर क्रिकेटमध्ये पैशाची अक्षरश: गंगाच आणली आहे. आयपीएलची हीच पैशांची गंगा आता सौदी आपल्या देशात वळवू पाहतो आहे. येत्या काळात आयपीएलमध्ये सौदी अरेबियाची हिस्सेदारी वाढली तर आश्चर्य वाटायला नको. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी यासंदर्भात नुकतंच सुतोवाच केलं आहे. माध्यमांनीही यासंदर्भात हवाला दिला आहे. 

सौदी अरेबिया येत्या काही काळात आयपीएलमध्ये तब्बल तीस अब्ज डॉलर्स गुंतवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबियानं अलीकडेच फुटबॉल आणि गोल्फमध्येही मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला आहे; पण त्यापेक्षाही क्रिकेटमध्ये जास्त पैसा असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी आपला मोहरा क्रिकेटकडे वळवला आहे. क्रिकेटमध्ये ते प्रत्यक्ष आपले खेळाडू उतरवतील की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही; पण आपला ‘डाव’ मात्र ते क्रिकेटसाठी नक्कीच पणाला लावणार आहेत. रोनाल्डो आणि नेमारसारख्या दिग्गज फुटबॉलपटूंनी अख्ख्या जगावर आपली छाप सोडली आहे; पण जागतिकीकरणाच्या आजच्या जमान्यात हे दिग्गज खेळाडू अगदी स्थानिक फुटबॉल क्लबकडूनही खेळताना दिसतात. क्रिकेटमध्येही आता अनेक समीकरणं बदललेली दिसतील. ज्याच्याकडे पैसा आहे, असा जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातला व्यक्ती आता क्रिकेट संघांचा आणि ‘क्रिकेटपटूं’चा ‘मालक’ झालेला पाहायला मिळू शकेल! 

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची क्रिकेटमधील रुची हळूहळू वाढते आहे. त्यासंदर्भात तज्ज्ञांकडून ‘विशेष धडे’ घ्यायलाही त्यांनी सुरुवात केली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यांतच ते भारतात येऊन गेले. पहिल्या भेटीतच त्यांनी आयपीएलमध्ये पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करायला तयारी दाखवली होती; पण त्यांच्या सल्लागारांनी त्यांना आयपीएलमध्ये जास्त पैसा गुंतवण्याचा सल्ला दिल्यानं लगेच काही दिवसांतच त्यांनी ही रक्कम वाढवून तीस अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची तयारी दाखवली; पण माहीतगारांचं म्हणणं आहे, मोहम्मद बिन सलमान यांची आयपीएलमध्ये यापेक्षाही जास्त पैसे गुंतवायची तयारी आहे! भारताबाहेरही जगात अनेक ठिकाणी आयपीएल नेण्याची त्यांची तयारी आहे. सगळं जर मनासारखं जुळून आलं तर तेलावर गब्बर झालेला हा देश आता क्रिकेटमधूनही मोठ्या प्रमाणावर पैसा कमवायला लागेल! किंबहुना तेलावरचं आपलं अवलंबित्व कमी करणं हेच सौदी अरेबियाचं प्रमुख धोरण आहे. उद्या समजा आपल्याकडचं तेल संपलंच किंवा तेलाला दुसरा पर्याय सापडला तर आपल्या देशाचे हाल होऊ नयेत, यादृष्टीनंच सौदीची वाटचाल सुरू आहे. 

खोऱ्यानं कमावला पैसा! 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातल्या सर्वांत श्रीमंत स्पोर्ट्स लीगपैकी एक मानली जाते. २००८मध्ये ही लीग सुरू झाली आणि बघता बघता तिनं खोऱ्यानं पैसा कमवायला सुरुवात केली. आयपीएलचे आतापर्यंत १६ सिझन झाले आहेत आणि प्रत्येक सिझन पहिल्यापेक्षा अधिक गाजला आहे. आधीपेक्षा त्यानं जास्त पैसे कमावले आहेत.

Web Title: It will not be surprising if Saudi Arabia's stake in the IPL increases in the coming years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.