मी सक्तीच्या विजनवासात -मल्ल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2016 03:45 AM2016-04-30T03:45:28+5:302016-04-30T03:45:28+5:30
सक्तीच्या विजनवासात असून तूर्त भारतात परतण्याचा आपला कोणताही इरादा नाही, असे संकटग्रस्ट भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी म्हटले
लंडन : आपण सक्तीच्या विजनवासात असून तूर्त भारतात परतण्याचा आपला कोणताही इरादा नाही, असे संकटग्रस्ट भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी म्हटले आहे.
भारतात बँकांचे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत ठेवल्याप्रकरणी मल्ल्यांविरुद्ध चौकशी सुरू आहे. केंद्रीय तपास संस्थांनी अलीकडेच त्यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्यांनी ब्रिटनमधील ‘फायनान्शियल टाइम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. मुलाखतीत ते म्हणाले की, किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जाबाबत आपण कर्जदात्या बँकांशी रास्त समझोता करण्यास तयार आहोत. तथापि, पासपोर्ट रद्द करून अथवा मला अटक करून त्यांना एक पैसाही मिळणार नाही. किंगफिशर ही मल्ल्या यांची कंपनी असून ती दिवाळखोरीत निघाली आहे.
मल्ल्या यांनी सांगितले की, मी निश्चितपणे भारतात परतू इच्छितो; परंतु सध्या परिस्थिती माझ्या एकदम विरोधात आहे. सरकारचे पुढचे पाऊल काय असेल हे मला माहीत नाही. मी एक सच्चा देशभक्त असून भारतीय राष्ट्रध्वज उंच ठेवण्यात मला नेहमीच गर्व वाटतो. तथापि, आपल्याविरुद्ध भारतात जोपर्यंत हाकाटी सुरू आहे. तोपर्यंत ब्रिटनमध्येच सुरक्षित रहाण्यात आपणास आनंद वाटत असून, तूर्तास हा देश सोडण्याचा आपला कोणताही विचार नाही. मल्ल्या म्हणाले की, भारतातील आजचे वातावरण समजून घेणे महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया केवळ लोकांचे मत बनविण्यातच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय असे नाही, तर सरकारलाही मोठ्या प्रमाणात चिथावत आहे.
भारत सरकारने गुरुवारी ब्रिटन सरकारला पत्र पाठवून मद्यसम्राट मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. (वृत्तसंस्था)
हवाला व्यवहारप्रकरणी मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वारंट काढण्यात आले आहे. फायनान्शियल टाइम्सने सेंट्रल लंडनमधील मेफेअर येथे मल्ल्या यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत चार तास चालली. मल्ल्या २ मार्च रोजी विमानाने दिल्लीहून लंडनला पोहोचले. तत्पूर्वी, सरकारी बँकांच्या एका गटाने मल्ल्यांची बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईनवरील नऊ हजार कोटी रुपयांच्या वसुलीवरून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. किंगफिशरसाठी घेतलेले कर्ज दुसऱ्या कामासाठी वापरल्याचा किंवा त्याद्वारे इतरत्र संपत्ती खरेदी केल्याचा आरोप मल्ल्या यांनी फेटाळून लावला. सरकार किंगफिशरच्या खात्यांची तपासणी आणि बँकांच्या कर्जाच्या उपयोगाबाबत जगातील सर्वोत्कृष्ट लेखापरीक्षकाची नियुक्ती करू शकते. लेखापरीक्षणातून त्यांना काहीही गैर आढळणार नाही.