Jack Ma Missing: जॅक मा अचानक प्रकटले; व्हिडीओद्वारे दिला संदेश...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 11:15 AM2021-01-20T11:15:56+5:302021-01-20T11:16:31+5:30
Jack Ma Missing: ग्लोबल टाईम्सने मा यांना इंग्रजी शिक्षक ते उद्योजक बनल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांची ओळख सांगताना कुठेही अली बाबाचा उल्लेख केलेला नाही.
बिजिंग : चीनच्या व्याजखोरीवर बोलणारे अलीबाबाचे मालक आणि अब्जाधीश उद्योगपती जॅक मा गेल्या काही दिवसांपासून गायब झाले होते. आज ते जगासमोर अचानक प्रकटले आहेत. जगभरातून मा यांच्याबाबत प्रश्न विचारले जात असताना चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जॅक मा यांचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. यानुसार मा यांनी बुधवारी चीनच्या ग्रामीण भागातील 100 शिक्षकांसोबत व्हिडीओ लिंकद्वारे संवाद साधला आहे. मा यांनी सांगितले की, जेव्हा कोरोना व्हायरस संपेल तेव्हा आपण पुन्हा भेटू.
ग्लोबल टाईम्सने मा यांना इंग्रजी शिक्षक ते उद्योजक बनल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांची ओळख सांगताना कुठेही अली बाबाचा उल्लेख केलेला नाही. खरेतर अलीबाबाची स्थापना मा यांनीच केली होती. गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये अफवांचा बाजार गरम झाला आहे. अलीबाबावर चीन सरकार कब्जा करू शकते, असे बोलले जात आहे. त्याआधी जगभरात प्रसिद्ध असलेले जॅक मा हे गायब झाल्याने मोठ्या अफवा उठल्या होत्या. गेल्या ऑक्टोबरमध्ये मा यांनी चिनी सरकारच्या व्याजखोर संस्था आणि सरकारी बँकांविरोधात वक्तव्य केले होते.
चीन का त्रास देतेय?
अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे ग्राहकांची माहिती आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीचं मोल त्यांच्या संपत्तीइतकंच मोठं आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारला हीच माहिती मा यांच्याकडून हवी आहे. यासाठी सरकारकडून बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मा यांनी अशा प्रकारचा तपशील देण्यास विरोध केला आहे. जॅक मा यांच्या एंट समूहाकडे कोट्यवधी ग्राहकांचा तपशील आहे. चीनमधील वित्तीय नियामक संस्थेला हा तपशील हवा आहे. त्यासाठी मा यांच्यावर बराच दबाव आणला जात आहे.
चीनच्या देखरेखीखाली...
जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र 'पीपल्स डेली'ने जॅक मा यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या वृत्तपत्रानुसार, जॅक मा यांना एका अज्ञातस्थळी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच चिनी सरकारकडून जॅक मा यांना देश सोडून न जाण्याची ताकीद दिली आहे, अशी माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.