जेकब झुमा पायउतार होताच कोसळले 'गुप्ता साम्राज्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 03:05 PM2018-02-22T15:05:51+5:302018-02-22T15:16:38+5:30

दक्षिण आफ्रिकेच्या सत्ता आणि उद्योग वर्तुळात वावरणारे आणि गेली चार वर्षे दक्षिण आफ्रिकेतील महत्वांच्या लोकांमध्ये नाव असणाऱ्या अजय, अतुल, राजेश या गुप्ता बंधुंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे.

Jacob's empire collapsed as Gupta's empire | जेकब झुमा पायउतार होताच कोसळले 'गुप्ता साम्राज्य'

जेकब झुमा पायउतार होताच कोसळले 'गुप्ता साम्राज्य'

Next
ठळक मुद्दे1990 दशकात सुरुवातीच्या वर्षांमध्ये गुप्ता कंपनी भारतातून दक्षिण आफ्रिकेत गेली. खाणउद्योगाबरोबर अनेक व्यवसायांध्ये त्यांनी बस्तान बसवलं फिरण्यासाठी त्यांनी स्वतःचं जेट विमानही घेतलं. केप-टाऊनपासून दुबईपर्यंत त्यांनी मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे आलिशान बंगले बांधले.

जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेच्या सत्ता आणि उद्योग वर्तुळात वावरणारे आणि गेली चार वर्षे दक्षिण आफ्रिकेतील महत्वांच्या लोकांमध्ये नाव असणाऱ्या अजय, अतुल, राजेश या गुप्ता बंधुंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पदत्याग केल्यानंतर या गुप्ता बंधुंचे दिवस झपाट्याने फिरले आहेत.
 
गेले अनेक महिने गुप्ता बंधुंवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. लग्नसमारंभात पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी अत्यंत सुरक्षित अशा लष्करी तळाचा वापर करणे, सरकारी कंपन्यांमध्ये आपले लोक विविध पदांवर बसवणे, नेमणुका करण्यासाठी कॅबिनेटमधील सदस्यांवर प्रभाव टाकणे, मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर होत होते. मात्र केवळ तपास चालू आहे असे सांगत तपास यंत्रणांनी कोणतीही प्रत्यक्ष कारवाई त्यांच्यावर केली नव्हती.
मात्र ही सगळी परिस्थिती 14 फेब्रुवारी रोजी बदलली. राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली. गुप्तांच्या जोहान्सबर्गमधील सॅक्झनवर्ल्ड येथील आलिशान अशा संकुलावर छापा टाकण्यात आला तसेच त्यांच्या अनेक सहकार्यांना अटक झाली. इतकेच नाही तर गुप्तां बंधूंमधील ज्येष्ठ बंधू अजयला फरार घोषित करण्यात आले.

गुप्ता साम्राज्य दक्षिण आफ्रिकेत कसे उभे राहिले?
1990 दशकात सुरुवातीच्या वर्षांमध्ये गुप्ता कंपनी भारतातून दक्षिण आफ्रिकेत गेली. खाणउद्योगाबरोबर अनेक व्यवसायांध्ये त्यांनी बस्तान बसवलं. फिरण्यासाठी त्यांनी स्वतःचं जेट विमानही घेतलं. केप-टाऊनपासून दुबईपर्यंत त्यांनी मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे आलिशान बंगले बांधले. जेकब झुमांचा मुलगा दुदुझेन हा त्यांचा व्यवसायात भागीदारच झाला तर त्यांच्या एका पत्नीला कंपनीचे कर्मचारी करण्यात आले. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची ये जा करण्यासाठी त्यांनी वॉटरक्लूफ हवाईतळाचा वापर केल्यानंतर 2013 साली गुप्तांचं नाव एकदम चर्चेत आले. अर्थराज्यमंत्री मकेबिसी जोनास यांनी व्यवसायासाठी विविध सवलती दिल्या तर आपल्याला अर्थमंत्री करु अशी ऑफर गुप्ता बंधुंनी दिल्याचा आरोप केला होता आणि त्यासाठी झालेल्या बैठकीचे आयोजन जेकब झुमांचा पुत्र दुदुझेनने केले होते असाही त्यांचा आरोप होता. गुप्ता आणि झुमा या दोघांनीही हे आरोप फेटाळले होते.  त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये गुप्ता बंधुंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ लागली. त्यांच्या विविध पार्ट्यांमध्ये बोलावलेल्या पाहुण्यांची यादीही प्रसिद्ध झाली होती. जेकब झुमा राष्ट्राध्यक्षपदी असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आता मात्र त्यांच्या साम्राज्याला कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Jacob's empire collapsed as Gupta's empire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.