एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:11 AM2024-10-16T11:11:12+5:302024-10-16T11:16:04+5:30
SCO Summit 2024 : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये SCO Summit 2024) सहभागी होण्यासाठी एस. जयशंकर हे पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत.
SCO Summit 2024 : इस्लामाबाद : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे काल (दि.१५) पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. नूर खान एअरबेसवर पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एस. जयशंकर यांचे स्वागत केले. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये SCO Summit 2024) सहभागी होण्यासाठी एस. जयशंकर हे पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान, एस. जयशंकर हे विविध देशांच्या प्रतिनिधींसोबत अधिकृत बैठकांव्यतिरिक्त मोकळ्या वेळेचा आनंद घेत आहेत. एस. जयशंकर यांनी बुधवारी (दि.१६ ) सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "आमच्या उच्चायुक्तालयाच्या परिसरात भारत-पाकिस्तान टीमच्या सहकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉक."
A morning walk together with colleagues of Team @IndiainPakistan in our High Commission campus. pic.twitter.com/GrdYUodWKC
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 16, 2024
समिटमध्ये आज काय?
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) समिटच्या आजच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पाकिस्तानमधील जिना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्वागत भाषण करतील आणि प्रत्येक नेत्याचे स्वागत करतील. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक फोटोग्राफीने होईल, त्यानंतर पंतप्रधान शरीफ यांचे उद्घाटन भाषण होईल.
कोणा-कोणाचा समावेश असेल?
या समिटमध्ये भारत, चीन, रशिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे प्रतिनिधी सहभागी होत असून, इराणचे उपराष्ट्रपती आणि मंगोलियाचे पंतप्रधानही यात सहभागी झाले आहेत. मंत्रिमंडळाचे उपाध्यक्ष आणि तुर्कमेनिस्तानचे परराष्ट्र मंत्रीही विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
या मुद्द्यांवर होणार चर्चा
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आजच्या सत्रातील चर्चेत आर्थिक सहकार्य, व्यापार, पर्यावरणीय समस्या आणि सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सदस्यांमधील सहकार्य वाढवण्यासाठी आणि संस्थेच्या बजेटला मंजुरी देण्यासाठी नेते महत्त्वाचे निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री ९ वर्षांनंतर पाकिस्तानात
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात पोहोचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचे परराष्ट्रमंत्री हे पाकिस्तानला भेट देण्यासाठी गेले आहेत. यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.