बॉम्बस्फोटांनी जकार्ता हादरले
By admin | Published: January 15, 2016 04:36 AM2016-01-15T04:36:57+5:302016-01-15T04:36:57+5:30
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे गुरुवारी झालेल्या स्फोटांमुळे सर्व आग्नेय अशिया आणि जग हादरून गेले आहे. या स्फोटांची आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली
- 6 ठिकाणी बॉम्बस्फोट आणि बेछूट गोळीबार
- 2 आत्मघाती दहशतवाद्यांचा समावेश
- 5 दहशतवाद्यांसह सात जणांचा मृत्यू आणि १९ जखमी, इसिसने घेतली जबाबदारी
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे गुरुवारी झालेल्या स्फोटांमुळे सर्व आग्नेय अशिया आणि जग हादरून गेले आहे. या स्फोटांची आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी इसिसने घेतली असून, या घटनेत
५ हल्लेखोरांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्टारबक्स कॅफे आणि जकार्तामधील सर्वांत जुने डिपार्टमेंटल स्टोअर सारिनाहजवळ झालेल्या हल्ल्याविरोधातील कारवाई संपविण्यास सुरक्षा दलांना तीन तास लागले. या हल्ल्यात एका इंडोनेशियन व एका कॅनेडियन नागरिकाचे प्राण गेले आहेत. या हल्ल्यामागे इंडोनेशियन दहशतवादी बाहरुन नयीमच असल्याची खात्री पोलिसांनी व्यक्त केली आहे. कारवाईनंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी घटनास्थळास भेट घेऊन पाहणी केली. सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या आणि दहशत पसरविण्याच्या या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो, असे सांगत विडोडो यांनी आपण पोलिसांना कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.