’२४ फेब्रुवारीपासून जग बदललं,’ जमैका म्हणाला, “गव्हासाठी आपला मित्र भारताशी सुरु आहे चर्चा”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:40 PM2022-05-18T16:40:16+5:302022-05-18T16:41:12+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सध्या जमैकाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्जमैकाचे उद्योग, गुंतवणूक आणि वाणिज्य मंत्री ऑबिन हिल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सध्या जमैकाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान जमैकाचे उद्योग, गुंतवणूक आणि वाणिज्य मंत्री ऑबिन हिल यांनी जमैकाचे भारतासहगुंतवणूकीचे संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा केली. भारतातून गहू, खते आणि कृषी उपकरणं आयात करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. शिवाय भारतासोबत गुंतवणूक क्षेत्रात संबंध निर्माण करण्याची चर्चा सुरू असून याचा दोन्ही देशांना फायदा होणार असल्यातचंही त्यांनी सांगितलं.
"फक्त गहूच नाही तर खते आणि कृषी उपकरणे यांची विक्री करण्यासाठी भारताशी चर्चा सुरू आहे. आम्ही भारतीय ट्रक आणि बसेससाठी वितरक स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही देशांच्या फायद्यासाठी व्यावसायिक आणि गुंतवणुकीची संधी शोधत आहोत,” असं हिल यावेळी म्हणाले.
२४ फेब्रुवारीपासून जग बदललं
हिल यांनी रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अन्न असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. गव्हाची आयात आता पुरेशी असली तरी अनिश्चितता अजूनही कायम आहे. आज आमच्याकडे पुरेशी गव्हाची आयात आहे, पण उद्या काय होईल हे आपल्याला माहीत नाही. कारण २४ फेब्रुवारीला जग बदलले. रशियाचे आता युक्रेनशी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मित्र भारताशी चर्चा करू," असंही त्यांनी नमूद केले.
जसं आम्ही कोरोनाच्या महासाथीतून बाहेर येत आहोत, तसं आम्ही भारतीय गुंतवणूकदार आणि औषध कंपन्यांना बोलावत आहोत. आम्ही तुमच्या फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी लॉजिस्टिक हब बनण्याची तयारी करत आहोत, असंही हिल यावेळी म्हणाले.