जपानमध्ये चेरीचे वृक्ष १,२०० वर्षांत फुलांनी यंदा लवकर बहरले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:11 AM2021-04-01T05:11:18+5:302021-04-01T05:12:13+5:30
वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग मोहक फुलांनी बहरले आहेत. चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर १,२०० वर्षांत लवकरच आला आहे.
टोकियो : वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग मोहक फुलांनी बहरले आहेत. चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. तज्ज्ञांच्या मते हवामानातील बदल हेच यामागचे कारण असावे.
सकुरा हे जपानचे आवडते फूल होय. ही फुले एप्रिलमध्ये बहरतात. ही फुले बहरण्याचा हंगाम एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जात असतो. शालेय आणि व्यावसायिक वर्षारंभाशी मेळ घालत ही फुले बहरतात.
जागतिक हवामानातील बदलाचा प्रभाव हेच चेरीचा वृक्ष मोहोरण्याचा हंगाम लवकर येण्यामागचे कारण असावे, असे जपानच्या हवामान संस्थेचे शुन्जी अन्बे यांनी म्हटले आहे. चेरीचे वृक्ष तापमानात होणाऱ्या बदलाच्या दृष्टीने संवेदनशील असतात. चेरी वृक्ष बहरण्याचा हंगाम पर्यावरणातील बदलाचे अध्ययन करण्यासाठी सहायक ठरू शकतो.
इतिहासातील दाखले काय सांगतात?
क्योटोतील ऐतिहासिक दस्तावेज, नोंदणी आणि काव्यसंग्रहातील संदर्भानुसार हा हंगाम यंदा खूप लवकर आला आहे. उपलब्ध ऐतिहासिक दस्तावेज धुंडाळल्यानंतर ओसाका विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्रज्ञ यासूयुकी आनो यांनी यापूर्वी २७ मार्च रोजी १६१२, १४०९ आणि १२३६ या वर्षात लवकर हा मोहोर आल्याचे म्हटले आहे. त्यांनी कोर्टातील इसवी सन ८१२ पर्यंतच्या दस्तावेजांचा मागोवा घेतला.