‘पेपर’ नावाचा रोबोट घेणार कोरोना रुग्णांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 02:32 PM2020-05-11T14:32:54+5:302020-05-11T14:37:25+5:30
टोक्यो शहरात 5 हॉटेल्स सरकारने ताब्यात घेतले असून तिथं कृत्रिम बुदिमत्ता असलेले रोबोट रुग्णसेवेत दाखल आहेत.
कोरोना व्हायरसने शिस्तप्रिय जपानी समाजालाही घेरलंच. आजच्या घडीला जपानमध्ये 15,556 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 585 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. जपानच्या लोकसंख्येत तरुणांपेक्षा ज्येष्ठांचे प्रमाण जास्त असल्याने तिथं खबरदारीही अधिक घेतली जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून टोक्यो शहरात एक उपक्रम सुरु करण्यात आला.
ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, पण त्यांना संसर्ग झालेला आहे असे रुग्ण आणि ज्यांच्या मध्यम लक्षणं आहेत अशा रुग्णांना दवाखान्यात न ठेवता हॉटेल्समध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दवाखान्यांवरचा वाढता ताण कमी करणं आणि ज्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करणं असा यामागचा हेतू.
त्यासाठी टोक्यो शहरात 5 हॉटेल्स मिळून दहा हजार हॉटेल रुम्स सरकारने ताब्यात घेतल्या असून तिथं रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी दोन नर्स आणि एका डॉक्टरचीही नेमणूक करण्यात येईल.
मात्र या रुग्णांची त्या हॉटेल्समध्ये काळजी घ्यायला ‘रोबोट’ची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘पेपर’ असं या रोबोटचं नाव.
तो या हॉटेलमधल्या रुग्णांच्या दिमतीला पांढरा सर्जिकल मास्क लावून हजर आहे.
सॉफ्टबॅँक रोबोटिक्स नावाच्या कंपनीने बनवलेला हा रोबोट अनेक प्रकारची कामं करणार आहे.
म्हणजे तो टॉकिंग रोबोट आहे. तो स्वागत कक्षात रुग्णांचं स्वागत करेल.
त्यांना सांगेल, की मास्क निट लावा. ताप किती तपासला का, तो नोंदवून घ्या. मग गप्पाही मारेल की, काळजी करू नका, लवकर बरे व्हाल.
क्लिनिंग रोबोट म्हणूनही काम करेल, या रुग्णांच्या खोल्यांसह ते ज्या भागात राहतील त्या भागात सफाईचं काम रोबोट करेल.
डायनिंग एरियात मदत करायला हजर राहील.
आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन हा रोबोट प्रत्येक रुग्णाची काळजी घेईल, त्याच्याकडे रुग्णाची सारी माहितीही असेल.
रेड झोनमध्ये अधिकाधिक हे रोबोट वापरण्याचा जपान सरकारचा मानस आहे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रतील मनुष्यबळावरचा ताण आणि त्यांना असलेला संसर्ग धोका कमी होईल.
टोक्योतल्या एका हॉटेलात या पेपर रोबोटने टोक्यो गव्हर्नर युरीको कोईके यांचं स्वागत केलं. आणि कामाला सुरुवात केली.
यंत्र माणसांचं जगणं सोपं करतात, याचं हे एक आणखी पुढचं पाऊल आहे, संकटकाळातलं.