जपानमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, अद्यापही सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 12:14 PM2024-01-06T12:14:57+5:302024-01-06T12:26:26+5:30

1 जानेवारीला जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे एकूण 155 भूकंपाचे धक्के जाणवले.

Japan earthquakes death toll climbs to 100 as more survivors pulled from rubble | जपानमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, अद्यापही सतर्कतेचा इशारा

जपानमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस, आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, अद्यापही सतर्कतेचा इशारा

पश्चिम जपानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या शनिवारी 100 वर पोहोचली आहे. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यानंतर बचाव पथकं सावधपणे लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. याआधी भूकंपात मृतांचा आकडा 98 वर पोहोचला होता, मात्र अनामिझूमध्ये आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने हा आकडा 100 वर पोहोचला आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इशिकावा प्रीफेक्चरमधील अधिकाऱ्यांनी दैनंदिन बैठक घेतली. 

भूकंपात कोसळलेल्या घरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जीवन-मरणाची लढाई सुरू असलेल्या लोकांना अखेर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. एकामागून एक भूकंपाने हादरलेल्या जपानच्या पश्चिम किनाऱ्यावर 72 तासांनंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. इशिकावा अधिकार्‍यांनी सांगितले की, मृतांपैकी 59 वाजिमा शहरातील, 23 ​​सुझूचे, तर इतर पाच शेजारील शहरांतील आहेत. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात 500 हून अधिक लोक जखमी झाले असून, त्यापैकी 27 जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, भूकंपानंतर लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकं कार्यरत आहेत आणि यात अनेक कर्मचारी बचावाच्या कामी लागले आहेत. तर टोकियो विद्यापीठाच्या भूकंप संशोधन संस्थेला असे आढळून आले की, पश्चिम जपानमधील काही ठिकाणी, वालुकामय किनारे समुद्राच्या दिशेने 250 मीटर (820 फूट) पर्यंत सरकले आहेत.

दरम्यान, गेल्या 1 जानेवारीला जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे एकूण 155 भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी मोजली गेली. भूकंपानंतर समुद्रात 1 मीटर उंच लाटा उसळल्या होत्या. यानंतर जपाननेही त्सुनामीचा इशारा दिला होता. भूकंपानंतर सर्वजण आपापल्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. या भूकंपाचे अनेक व्हिडिओ अजूनही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रस्ते तुटलेले दिसत आहेत. काही ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर काही ठिकाणी लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसतात.
 

Web Title: Japan earthquakes death toll climbs to 100 as more survivors pulled from rubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.