शिंजो अबेंचा खून ५ कोटी रुपयांसाठी! जपानच्या माजी पंतप्रधानांच्या हत्याकांड प्रकरणात नवा खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:26 PM2022-09-23T16:26:48+5:302022-09-23T16:28:04+5:30
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. जपानच्या सत्ताधारी पक्षाशी जवळचे संबंध असलेल्या युनिफिकेशन चर्चनं दिलेल्या माहितीवरून या हत्येमागील कारणं समोर येत आहेत.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. जपानच्या सत्ताधारी पक्षाशी जवळचे संबंध असलेल्या युनिफिकेशन चर्चनं दिलेल्या माहितीवरून या हत्येमागील कारणं समोर येत आहेत. चर्चने कबूल केलं आहे की ज्या व्यक्तीनं शिंजो आबे यांना मारलं त्याच्या आईनं गरजेपेक्षा जास्त आर्थिक मदत देऊ केली होती. त्यामुळे मुलानं अबे यांची हत्या केली हे संभाव्य कारण असू शकतं.
दोन महिन्यांपूर्वी ८ जुलै रोजी शिंजो अबे जपानमधील नारा येथे एका रॅलीला संबोधित करत होते. त्याच वेळी ४१ वर्षीय तेत्सुया यामागामी यानं त्यांची सार्वजनिकरित्या गोळ्या घालून हत्या केली. त्यासाठी त्यांनी घरीच बंदूक तयार केली होती. त्याच्या कबुली जबाबानुसार युनिफिकेशन चर्चशी संबंध ठेवल्यामुळे अबे यांची हत्या केली. या चर्चला जपानमध्ये मूनीज असंही म्हणतात. चर्चमुळे त्यांचं कुटुंब दिवाळखोरीत निघाल्याचं आरोपीनं सांगितलं. यामागामीची आई बऱ्याच काळापासून या चर्चची सदस्य आहे.
दोन दशकात दिली इतकी वर्गणी
गेल्या दोन दशकांत आरोपीच्या आईनं 100 मिलियन येन (सुमारे साडेपाच कोटी रुपये) चर्चला दान केले होते. एवढंच नाही तर त्यांनी आपला आयुर्विमा आणि जमीनही दान केली. मात्र, संशयिताच्या काकांच्या सांगण्यावरून अर्धी मालमत्ता परत केल्याचं चर्चचं म्हणणे आहे. या कारणामुळे त्यांचं कुटुंब गरिबीच्या खाईत लोटलं गेलं. चर्चचं वरिष्ठ अधिकारी हिदेयुकी तेशिगवारा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यामागामी याने पोलिसांना जे सांगितलं त्यामुळे ते खूप दुःखी झाले आहेत. यामागामीने पोलिसांना सांगितले की त्याला चर्चचा राग होता. चर्चमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा देणग्या जबरदस्तीने घेतल्या जाणार नाहीत याची ते आता खात्री करत आहेत. अनुयायी किंवा कुटुंबीयांच्या दबावाशिवाय दान केले पाहिजे. शिंजो अबे यांचेही या चर्चशी जवळचे संबंध होते.
चर्चपासून स्वत:ला दूर ठेवतंय सरकार
जपानमध्ये पक्षाच्या सर्वेक्षणातून निम्म्याहून अधिक खासदार आणि मंत्र्यांचे चर्चशी संबंध असल्याचे समोर आलं आहे. शिंजो अबे यांच्या हत्येनंतर सध्याचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शपथ घेतली आहे की त्यांचं सरकार चर्चशी असलेले सर्व संबंध तोडेल. पण राजकीय पक्षांची या चर्चशी इतकी जवळीक का आहे हे जपानमधील सर्वसामान्यांना जाणून घ्यायचं आहे.
1954 साली चर्चची स्थापना
युनिफिकेशन चर्चची स्थापना प्रथम 1954 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाली. एका दशकानंतर ते जपानमध्ये दाखल झाले. ही मंडळी साम्यवादाच्या विरोधात होती. हे चर्चही बरेच वादात सापडलेलं आहे. जपानमधील नागरिकांनी अनेकदा याला विरोध केला आहे.