जपानने उत्तर कोरियाच्या दिशेने तैनात केली इंटरसेप्टर क्षेपणास्त्र! हवेतच नष्ट होणार मिसाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 06:45 PM2017-09-19T18:45:06+5:302017-09-19T18:53:53+5:30
उत्तर कोरियाकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन जपानने होककायडो बेटावर इंटरसेप्टर क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे.
टोकयो, दि. 19 - उत्तर कोरियाकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन जपानने होककायडो बेटावर इंटरसेप्टर क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता या मोबाइल मिसाइल डिफेंन्स सिस्टीममध्ये आहे. उद्या आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास खबरदारी म्हणून होककायडोच्या दक्षिणेला इंटरसेप्टर क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्यात येत आहे असे जपानचे संरक्षण मंत्री इतसुनोरी ऑनओडेरा यांनी सांगितले.
उत्तर कोरियाने मागच्या आठवडयात क्षेपणास्त्र चाचणी केली. यावेळी त्यांनी डागलेले क्षेपणास्त्र दक्षिण होककायडोवरुन गेले व पॅसिफिक महासागरात कोसळले. महिन्याभराच्या आतमध्ये उत्तरकोरियाने दुस-यांदा अशा प्रकारची चाचणी केली त्यामुळे जपानने इंटरसेप्टर डिफेंन्स मिसाइल सिस्टीम होककायडो बेटावर तैनात केली आहे.
कालच सोमवारी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला. अमेरिकेची चार F-35B स्टेलथ फायटर जेट आणि दोन B-1B बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती. अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचे एकत्रित उड्डाण हा नियमित सरावाचा भाग होता. संयुक्त कारवाईची क्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कवायती यापुढेही सुरु राहतील असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
दक्षिण कोरियाची चार F-15K फायटर जेट विमाने या सरावात सहभागी झाली होती. यापूर्वी 31 ऑगस्टला अशा प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला होता. उत्तर कोरियानवे बेजबाबदारपणे जी शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालवली आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा वारंवार अमेरिकेकडून इशारा देण्यात येत आहे.
तरीही उत्तर कोरियाच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाच्या कापड निर्यातीवर बंदी आणली असून, तेल आयात करण्यावरही मर्यादा आणल्या आहेत. यूएनच्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाच्या कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेला थोडी झळ बसेल. कापड उद्योगात चीन उत्तर कोरियाचा सर्वात मोठा भागीदार आहे. उत्तर कोरियातूननिर्यात चीनला 80 टक्के कापड निर्यात होते. अमेरिकेतीलही काही कापड उद्योजक उत्तर कोरियावर अवलंबून आहेत.