जपानमध्ये कोरोनापेक्षाही मोठा धोका, सातत्याने आत्महत्या करताहेत लोक!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 30, 2020 07:04 PM2020-11-30T19:04:37+5:302020-11-30T19:09:22+5:30
जपानमध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 2153 जणांनी नैराश्यग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळले आहे. तर कोरोना महामारीमुळे येथे आतापर्यंत 2087 जणांचा मृत्यू झाला आहे.
टोकियो : एकिकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरस महामारीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे जपान, वेळीच केलेल्या कडक उपाय योजनांमुळे महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, सध्या त्याला एका वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. येथे कोरोनापेक्षाही आत्महत्या करून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे.
जपानने जारी केला आत्महत्यांचा डेटा -
जपानच्या National Police Agencyने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, तेथे ऑक्टोबर महिन्यात कोरोनापेक्षाही आत्महत्यांमुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 2153 जणांनी नैराश्यग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळले आहे. तर कोरोना महामारीमुळे येथे आतापर्यंत 2087 जणांचा मृत्यू झाला आहे.
लोकांवर Lockdown इफेक्ट -
कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यात लोक यशस्वी होत आहेत. मात्र, लॉकडाउन इफेक्टमुळे त्यांच्यावरील माणसिक तणाव वाढत आहे. यापासून स्वतःचा बचाव करण्यात ते अयशस्वी ठरत आहेत.
जपानमध्ये दोन वेळा सौम्य स्वरुपाचा लॉकडाउन -
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जपानमध्ये आतापर्यंत दोन वेळा लॉकडाउन लावण्यात आला आहे. जपानमधील मानसोपचार तज्ज्ञांच्या मते भारत, इटली, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांच्या तुलनेत जपानमधील लॉकडाउन सौम्य स्वरुपाचा होता. यामुळे, जपानमध्ये एवढे मृत्यू झाले, तर इतर देशांत यापेक्षाही अधिक मृत्यू झाले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, इतर देशांची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
कामाचे तास वाढवतायत लोकांचे टेंशन -
जपानमधील मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, तेथील आत्महत्यांचे कारण केवळ कोरोना व्हारसच नाही, तर कामाचे अधिक तास आणि कौटुंबिक जबाबदारीची योग्य प्रकारे सांगड घालता येत नसल्याने तेथील लोकांत तणाव वाढत आहे. याशिवाय सोशल डिस्टंसिंगमुळे मित्र आणि नातलगांची भेट न होणे, तसेच जीवन अंध:कारमय दिसत असल्यानेही आत्महत्यांचे प्रकार वाढत आहेत.
महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक -
जपानमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी आत्महत्यांच्या प्रमाणात प्रकर्षाने घट झाली होती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे पुन्हा एकदा आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे सरकार चिंतित आहे. एवढेच नाही, तर या डेटावरून, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचेही समोर आले आहे. जपानमध्ये महिलांशी संबंधित समस्यांकडे दीर्घ काळापासून दूर्लक्ष, हे यामागील महत्वाचे कारण मानले जात आहे.