अ‍ॅडोरेबल कपल... मिस्टर बॉन, मिसेस पॉन : ४२ वर्षे मॅचिंग कपडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:34 AM2022-05-04T06:34:33+5:302022-05-04T06:38:28+5:30

मॅचिंग जोडीदार मिळवणं ही आजकाल किती अवघड गोष्ट झाली आहे! मुळात आपल्याला चांगला, हवा तसा जोडीदार मिळणं, त्याच्याशी लग्न होणं, लग्न झालंच तर ते टिकणं, दोघांची मनं दीर्घकाळ जुळणं... या गोष्टी आता चित्रपट, कथा, कादंबऱ्यांमध्येही सापडत नाहीत, इतक्या दुर्मीळ झाल्या आहेत.

Japanese Couple Shows Their Love for One Another by Wearing Matching Outfits 42 years | अ‍ॅडोरेबल कपल... मिस्टर बॉन, मिसेस पॉन : ४२ वर्षे मॅचिंग कपडे

अ‍ॅडोरेबल कपल... मिस्टर बॉन, मिसेस पॉन : ४२ वर्षे मॅचिंग कपडे

googlenewsNext

मॅचिंग जोडीदार मिळवणं ही आजकाल किती अवघड गोष्ट झाली आहे! मुळात आपल्याला चांगला, हवा तसा जोडीदार मिळणं, त्याच्याशी लग्न होणं, लग्न झालंच तर ते टिकणं, दोघांची मनं दीर्घकाळ जुळणं, एकमेकांशी एकरूप होणं आणि गुण्यागोविंदानं त्यांनी आयुष्यभर एकत्र राहणं... या गोष्टी आता चित्रपट, कथा, कादंबऱ्यांमध्येही सापडत नाहीत, इतक्या दुर्मीळ झाल्या आहेत. अनेक देशांत अनेक उपवर तरुण- तरुणी एकतर आता लग्नच करत नाहीत. आयुष्यभर एकटंच राहणं  पसंत करतात. समजा त्यांनी लग्न केलंच, तर लग्नाच्या काही दिवसांतच काडीमोड होणं, हेही आता अनेकांना सवयीचं झालं आहे. 

लोकं तर आता सरळ सांगतात, अहो, कसं एकत्र राहाणार इतके दिवस, इतकी वर्षं? ‘मॅचिंग जोडीदार’ मिळवणं, मिळणं ही काय मॅचिंग सॉक्स मिळवण्याइतकी सोपी गोष्ट आहे? तुम्हीच सांगा, साधे मॅचिंग सॉक्स तरी  वेळेवर मिळतात का? मॅचिंग सॉक्स जाऊ द्या, निदान एकाच रंगाचे दोन्ही सॉक्स तरी सहजपणे तुम्हाला सापडतात का? बऱ्याचदा सॉक्सच्या जोडीतला एक सॉक्स सापडला, तर दुसरा सॉक्स अख्खं घर शोधलं तरी सापडत नाही... असं असताना मॅचिंग जोडीदार ही गोष्टच तुम्ही आता सोडा...

लग्न न करण्यात किंवा लग्न झालं असेल, तर लगेच कोर्टात जाऊन घटस्फोट घेण्यात सध्या जपान हा देश आघाडीवर आहे. त्यामुळे तिथं अविवाहित आणि एकेकट्या लोकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच देशात अशी काही जोडपी आहेत, जी गेल्या कित्येक दशकांपासून एकत्र आणि अतिशय आनंदानं राहताहेत. म्हातारपण आलं तरी त्यांच्यातलं प्रेम कमी झालं नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतंच आहे. त्यातलंच एक जोडपं आहे मिस्टर बॉन आणि मिसेस पॉन. त्यांच्या लग्नाला आता ४२ वर्षं झाली आहेत; पण त्यांच्यातलं नातं लोणच्यासारखं मुरतच चाललं आहे आणि आणखीच स्वादिष्ट होत चाललं आहे.

हे जोडपं आज जगभरात प्रसिद्ध आहे. - कारण काय? हे जोडपं एकमेकांना अतिशय अनुरूप तर आहेच, इतकं की त्यांची चेहरेपट्टीही आता सारखीच दिसायला लागली आहे. इतकंच नाही, गेली अनेक वर्षं; असा एकही दिवस गेला नाही, ज्यादिवशी त्यांनी एकमेकांना मॅचिंग कपडे घातले नाहीत! लग्न झाल्यानंतर लगेच त्यांनी दोघांनीही एकाच रंगाचे, एकमेकांना मॅच होतील, असे कपडे घालायला सुरुवात केली; पण सुरुवातीला हे प्रमाण अधूनमधून होतं; पण नंतर मात्र त्यांनी रोज मॅचिंग कपडे घालायला सुरुवात केली. २०१६ ला त्यांनी आपलं एक कॉमन इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलं आणि मॅचिंग ड्रेसचे आपले फोटो त्यांनी त्यावर पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं नाव आहे ‘बॉनपॉन५११’. या अकाउंटमध्ये या दोघांचं नाव तर आहेच; पण त्यांच्या लग्नाची तारीखही गुंफलेली आहे. खरंतर बॉन आणि पॉन हे काही त्यांचं मूळ नाव नाही. आपल्या नावातही साधर्म्य असावं आणि त्यात यमक साधलं जावं यासाठी त्यांनी ही नावं धारण केली. मिस्टर बॉन यांचं खरं नाव तुयोशी आणि मिसेस पॉन यांचं खरं नाव तोमी सेकी. 

खऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे जोडपं आज जगभरात ओळखलं जातं; पण त्यापेक्षाही जास्त ते फेमस आहेत, ते आपल्या फॅशन सेन्समुळं. फॅशन आयकॉन म्हणून तरुणाईलाही त्यांनी मागं टाकलं आहे. इन्स्टाग्रामवर आपलं अकाउंट सुरू केल्यानंतर अल्पावधीतच त्यांचे साडेआठ लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स झाले. लोक अगदी चवीनं त्यांचे हसऱ्या चेहऱ्याचे, मॅचिंग ड्रेस दररोज पाहतात. ‘स्टाइल आयकॉन’ म्हणून जग आपल्याकडं पाहतं, याचा दोघांनाही आनंद आहे; पण ते म्हणतात, स्टाइल म्हणून नव्हे, तर आमचं आयुष्यच एकमेकांशी आता इतकं एकरूप झालं आहे, की गेली कित्येक वर्षे आपोआपच आम्ही मॅचिंग कपडे घालायला लागलो. शिवाय आमचे कपडेही कोणालाही परवडणारे, अतिशय साधे असे असतात. बऱ्याचदा तर आम्ही ‘रस्ते का माल सस्ते में... कोई भी कपडा उठाओ.. सौ रुपया’ या पद्धतीचेच कपडे विकत घेतो; पण सारख्याच रंगाचे मॅचिंग कपडे आम्ही घालत असल्यामुळं लोकांना ती स्टाइल वाटायला लागली आहे. 

तुमच्या या प्रेमाचं आणि इतकी वर्षं एकत्र राहाण्यामागचं रहस्य काय, असं विचारल्यालवर मिसेस पॉन हसतहसत सांगतात, त्याचं सारं क्रेडिट मिस्टर पॉन यांचं आहे. कारण ते खूपच वर्कोहोलिक आहेत. तरुणपणीसुद्धा ते सकाळीच कामाला जायचे आणि मध्यरात्रीनंतर परत यायचे. त्यामुळंच आमचं लग्न टिकलं!

आधी होतं ‘लाजाळूचं झाड’! 
मिस्टर पॉन यांना तरुणपणी मॅचिंग कपडे घालायला अतिशय ऑकवर्ड वाटायचं; पण नंतर मात्र त्यांच्यातला त्याविषयीचा लाजरेपणा गेला. दोघांच्याही वयाची संध्याकाळ जवळ येताना दोघांचेही केस रुपेरी आणि मॅचिंग झाल्यानंतर तर त्यांचा हा लाजाळूपणा पूर्णपणे संपुष्टात आला. आपले केस आधीच मॅचिंग आहेत, तर मग कपडे का नकोत, म्हणून या जोडप्यानं मग मॅचिंग कपडेही घालायला सुरुवात केली!

Web Title: Japanese Couple Shows Their Love for One Another by Wearing Matching Outfits 42 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.