जपानचे सम्राट अखिहितो करणार पदत्याग, राजघराण्यातील दोनशे वर्षांतील पहिलीच निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 12:38 PM2017-12-01T12:38:36+5:302017-12-01T15:43:00+5:30
जपानचे राजे अखिहितो यांनी 30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात जुने राजघराणे समजले जाणाऱ्या या कुटुंबात राजाने असे निवृत्त होण्याची वेळ 200 वर्षांनंतर येत आहे.
टोकियो- जपानचे राजे अखिहितो यांनी 30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात जुने राजघराणे समजले जाणाऱ्या या कुटुंबात राजाने असे निवृत्त होण्याची वेळ 200 वर्षांनंतर येत आहे. तब्येतीच्या कारणामुळे 83 वर्षिय अखिहितो यांनी हा निर्णय घेतला असून त्यापुर्वी त्यांनी इम्पिरियल कौन्सीलशी चर्चाही केली आहे.
आता हा निवृत्तीचा समारोह आणि नव्या राजाचे आगमन हे दोन्ही सोहळे जपानी जनता अत्यंत आनंदात साजरे करतील असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी स्पष्ट केले आहे. अखिहितो यांचे ज्येष्ठ पुत्र राजपुत्र नारुहितो आता राजगादीवर बसतील असे सांगण्यात येत आहे. नारुहितो हे 57 वर्षांचे आहेत. सुमारे 30 वर्षे राजसत्तेवरुन काम केल्यावर अखिहितो यांनी गेल्या वर्षी तब्येतीचे व वाढत्या वयाचे कारण सांगून निवृत्तीचे संकेत दिले होते, तेव्हाच जपानी जनतेला मोठा धक्का बसला होता.
जपानच्या राजघराण्याच्या इतिहासामध्ये पदत्याग करण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण गेल्या 200 वर्षांमध्ये कोणत्याही राजाने पदत्याग केलेला नव्हता. जपानच्या राजघराण्याला 2600 वर्षांचा इतिहास आहे. जून महिन्यात जपानी संसदेने राजाला पदाचा त्याग करण्याची परवानगी देणार ठराव मंजूर केला होता. अखिहितो यांच्यावर कर्करोगासाठी उपचार सुरु आहेत त्याचप्रमाणे त्यांची हृदयशस्त्रक्रीयाही झाली आहे. जपानचे याआधीचे सम्राट हिरोहितो आणि त्यांची पत्नी नागाको यांच्या पोटी अखिहितो यांचा 1933 साली जन्म झाला. आता अखिहितो यांच्यानंतर जे नारुहितो राजगादीवर येतील त्यांना केवळ एकच मुलगी आहे. जपानच्या राजगादीवर केवळ पुरुषांनाच बसता येते. त्यामुळे नारुहितो यांच्यानंतर त्यांचे बंधू फुमुहितो यांचा मुलगा हिसाहितो राजगादीवर येईल.
When Akihito steps down in April 2019 he will be the first titular head of the Japanese people to abdicate in about 200 years https://t.co/F3gJoVgxPcpic.twitter.com/4s7fRCAL9R
— TRT World Now (@TRTWorldNow) December 1, 2017