जपानमध्ये आभाळ फाटलं; अतिवृष्टीमुळे 100 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:57 PM2018-07-09T13:57:01+5:302018-07-09T13:59:28+5:30
भूकंपाचा सामना करणाऱ्या जपानमध्ये आभाळ फाटल्याचं चित्र पाहायला मिळतंय
हिरोशिमा: बऱ्याचदा भूकंपाचा सामना करणाऱ्या जपानमध्ये आभाळ फाटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सातत्याने कोसळणारा मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे.
पावसामुळे पश्चिम जपानमध्ये परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. काही गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे भूस्खलनही झाले आहे. तसेच कित्येक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतलं असून आतापर्यंत 20 लाख नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
Japanese government says 100 are dead or presumed dead after heavy rains, floods and mudslides in western Japan: The Associated Press
— ANI (@ANI) July 9, 2018
जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिदी सुगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 87 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर 13 जण बेपत्ता आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. अनेक लोकांची वाहनंही पुरात वाहून गेली आहेत. शेकडो लोक जखमी झाले आहेत. जवळपास 40 हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पुरापासून बचाव करण्यासाठी काही गावांतील लोकांनी घरांवरील छताचा आसरा घेतला आहे.
दर मिनिटाला समस्या वाढत असल्याने या आपत्कालीन परिस्थितीचे वर्णन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी ‘वेळेसोबतचा संघर्ष’ असे केले आहे. तसेच मदत कार्य, लोकांचा जीव वाचविणे आणि स्थलांतराचे काम ही एक लढाई आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही असंही पंतप्रधानांनी म्हटले आहे.