जपानी हॉटेलात महिलांना रडण्यासाठी खास खोल्या
By admin | Published: May 8, 2015 01:14 AM2015-05-08T01:14:39+5:302015-05-08T01:14:39+5:30
टोकिओ शहरातील एका हॉटेलने महिलांना रडण्यासाठी खास खोल्या ठेवल्या असून, या खोलीत रडू येणारे चित्रपट पाहण्याचीही सोय आहे
लंडन : टोकिओ शहरातील एका हॉटेलने महिलांना रडण्यासाठी खास खोल्या ठेवल्या असून, या खोलीत रडू येणारे चित्रपट पाहण्याचीही सोय आहे. याच खोलीत डोळ्यांचा मेकअपही ठेवण्यात आला असून डोळे पुसण्यासाठी लक्झरी टिश्यूही आहेत. महिलांचा तणाव कमी करण्यासाठी ही सोय करण्यात आल्याचा दावा हॉटेलने केला आहे. मित्सुई गार्डन योत्सुया हॉटेलने ही सोय केली असून महिलांच्या भावनिक समस्या या उपायाने दूर होतील अशी अपेक्षा आहे. या खाजगी खोलीत महिला मोकळेपणाने, आरामात रडू शकतील असाही दावा आहे.
दर रात्रीसाठी ८३ डॉलर असा या हॉटेलचा दर असून, त्यांनी रडण्यासाठी तयार केलेल्या विशेष खोलीत हमखास रडू येण्याच्या सर्व सोयी आहेत, असे मेट्रो को यूके या वेबसाईटने म्हटले आहे. या खोलीतील चित्रपटात फॉरेस्ट गम्प हा गाजलेला चित्रपट तसेच थ्री पपीज हा जपानी चित्रपट दाखवला जातो. थ्री पपीज हा जपानी चित्रपट भूकंपातून पिलांना वाचविण्यासाठी कुत्रीने केलेल्या प्रयत्नावर आधारित आहे. ज्यांना वाचून रडायचे असेल त्यांच्यासाठी मँगा नावाची मासिके आहेत. त्यातील लेख वाचा व रडा असे सांगण्यात येते.