7 तास आकाशात घिरट्या घालत राहिले विमान, लँडिंग झाल्यावर प्रवाशांना बसला आश्चर्याचा धक्का, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:31 PM2023-02-23T18:31:33+5:302023-02-23T18:33:49+5:30
वैमानिकाने बराच वेळ वाट पाहिली, मात्र परिस्थिती अनुकूल दिसत नसल्याचे सांगितले जात आहे.
टोकियो : जपानमधील एका विमानातील प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. जपानचे देशांतर्गत विमान टोकियो ते फुकुओकापर्यंत उड्डाण केल्यानंतर 7 तासांनंतरही आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकले नाही. दरम्यान, जपानी एअरलाईन्सच्या विमानाने टोकियोच्या हानेडा विमानतळावरून संध्याकाळी 6.30 वाजता उड्डाण केले होते. मात्र 4 तास उलटूनही खराब हवामान आणि कर्फ्यूमुळे विमान फुकुओका विमानतळावर उतरू शकले नाही. त्यानंतर विमान पुन्हा टोकियो विमानतळावर उतरवले. यादरम्यान वैमानिकाने बराच वेळ वाट पाहिली, मात्र परिस्थिती अनुकूल दिसत नसल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
जपान एअरलाइन्स कंपनीच्या JL331 विमानाने रविवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता फुकुओकासाठी 90 मिनिटांच्या विलंबाने उड्डाण केले. परंतु विमानाला तेथे उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. कारण, खराब हवामान आणि कर्फ्यूमुळे उशिरा येणारी सर्व विमाने तिथे उतरत होती. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही JL331 विमानाला उतरण्याची परवानगी न मिळाल्याने ते जवळच्या किटाक्युशु विमानतळावर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या विमानतळावर 300 प्रवाशांना हाताळण्यासाठी बससेवा उपलब्ध नव्हती, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तेथे उतरण्यासही परवानगी दिली नाही. त्यानंतर या विमानाला ज्या ठिकाणी उड्डाण केले होते त्या ठिकाणी परतावे लागले. अशाप्रकारे एकूण सात तासांचा वेळ वाया गेला आणि त्यानंतर 10:59 वाजता विमान 335 प्रवाशांसह तेथून उड्डाण केलेल्या ठिकाणी परतले.
JAL331 ダイバート
— うぱ💎🐬 (@pococha_upa) February 19, 2023
羽田発→福岡行
これ羽田着いた後ホテル用意してくれるんかな? pic.twitter.com/KRwKTEpzko
प्रवाशाने यू-टर्नचा फोटो केला शेअर
या विमानात बसलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या यू-टर्नच्या स्क्रीनचा फोटो शेअर केला आहे. दुसरीकडे, गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करताना, एअरलाइन्स कंपनीने प्रवाशांसाठी हॉटेल आणि टॅक्सींसाठी पैसे दिले आहेत. एअरलाइन्स व्यवस्थापनाने प्रवाशांना 20,000 येन ($150) रोख दिले.
अशीच घटना याआधी घडली होती
मागच्या आठवड्यातच न्यूझीलंडच्या ऑकलंडहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानासोबत असा प्रकार घडला होता. जवळपास 16 तासांच्या उड्डाणानंतर ऑकलंडला परत जावे लागले. न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावर विजेची समस्या निर्माण झाल्याने हे घडले. त्यामुळे विमान लँडिंग होऊ शकले नाही आणि विमानाला ऑकलंडला परतावे लागले.