माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा होणार जापानचे नवे पंतप्रधान, पुढच्या महिन्यात स्विकारणार पदभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:11 PM2021-09-29T13:11:41+5:302021-09-29T13:14:25+5:30
एका वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आलं होतं.
जापानचे माजी डिप्लोमॅट फुमियो किशिदा देशाचे पुढील पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची निवडणूक जिंकली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुार, निवडणूक जिंकताच किशिदा यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
किशिदा यांनी जापानच्या परराष्ट्र मंत्रीपदाचे कामही पाहिले आहे. त्यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख योशीहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. एका वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आलं होतं.
पुढच्या महिन्यात मिळेल जबाबदारी
लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला किशिदांच्या रुपात एक नवा नेता मिळाला आहे. सोमवारी संसदेत पंतप्रधानांच्या नावावर निर्णय घेण्यात येईल, तेव्हाच किशिदा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. किशिदांचा पक्ष संसदेवर नियंत्रण ठेवतो आणि आघाडीचा पक्ष म्हणून सरकारचा भाग आहे.
किशिदा यांनी जापानचे लसीकरण मंत्री असलेल्या तारो कोनो यांचा पराभव केला आहे. कानो व्यतिरिक्त, शर्यतीत साने ताकीची आणि सेको नोडा या दोन महिला उमेदवारही होत्या. पण दोघीही पहिल्या फेरीनंतर बाहेर पडल्या. पक्ष नेतृत्वाची निवडणूक जिंकल्यानंतर आता ते पुढील महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील.
किशिदा यांचा परिचय
किशिदा यांचा जन्म 29 जुलै 1957 रोजी मिनामी कु, हिरोशिमा येथील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही राजकारणी होते. किशिदा यांनी क्रेडिट बँक ऑफ जापानमध्ये बराच काळ काम केले. यानंतर त्यांची प्रतिनिधी सभागृहात सचिव म्हणून नियुक्ती झाली. 1993 मध्ये ते प्रतिनिधी सभागृहात निवडून आले आणि हिरोशिमामधून खासदार म्हणून येथे पोहोचले. 2007 ते 2008 पर्यंत, त्यांनी ओकिनावा व्यवहार मंत्री म्हणून अबे कॅबिनेटमध्ये काम केले आणि नंतर फकुडाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जोशुआ फाकुडा यांनी त्यांना ग्राहक व्यवहार आणि अन्न सुरक्षा राज्यमंत्री केले होते. त्यानंतर 2012 ते 2017 पर्यंत जपानचे परराष्ट्र मंत्री होते.