जपानचे PM फुमियो किशिदा यांनी मुलावरच घेतली मोठी अॅक्शन; सरकारी निवासस्थानी केली होती पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:04 AM2023-05-30T11:04:36+5:302023-05-30T11:05:08+5:30
या पार्टीचे फोटो साप्ताहिक शुकन बुंशुनने प्रसिद्ध केले होते.
टोकियो - जपानचे (Japan) पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्या मुलाच्या एका वैयक्तिक पार्टीनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान किशिदा सोमवारी म्हणाले, आपला मुलगा, एका खासगी पार्टीसाठी पंतप्रधान निवासस्थानाचा वापर केल्याची जबाबदारी घेतल्यानंतर, अपल्या कार्यकारी नीती सचिव पदाचा राजीनामा देत आहे. या पार्टीचे फोटो एका मॅक्झिनने प्रसिद्ध केल्यानतंर लोकांमध्ये प्रचंड राग होता.
AP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा मोठा मुलगा तथा त्यांच्या राजकीय व्यवहार कार्यकारी सचिव शोतारो किशिदा (Shotaro Kishida) यांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी 30 डिसेंबर 2022 रोजी एका पार्टीसाठी नातलगांसह इतर लोकांनाही आमंत्रित केले होते. या पार्टीचे फोटो साप्ताहिक शुकन बुंशुनने प्रसिद्ध केले होते.
संबंधित वृत्तानुसार, या फोटोत नवनियुक्त कॅबिनेट प्रमाणे, पंतप्रधानांचा मुलगा आणि त्याचे नातलग रेड कार्पेटवर दाखवण्यात आले होते. तसेच इतर फोटोंमध्ये पाहुण्यांना पोडियमवर उभे केल्याचे दिसत आहे. जसे की, एखादी पत्रकार परिषद सुरू आहे. यानतंर,"राजकीय व्यवहार सचिव म्हणून त्यांचे काम अयोग्य होते. आपण त्यांची जबाबदारी निश्चित करत त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असे किशिदा यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास पत्रकारांना सांगितले.
किशिदा म्हणाले, गुरुवारी त्यांच्या मुलाच्या जागेवर ताकायोशी यामामोटो यांची नियुक्ती केली जाईल. यावेळी किशिदा यांनी कबूल केले की, त्यांनी थोडक्यात पाहुण्यांचे स्वागत केले होते. मात्र आपण डिनर पार्टीसाठी थांबलो नाही, असेही त्यांनी यावेली सांगितले. एवढेच नाही, तर आपण आपल्या मुलाला या पार्टीसाठी फटकारले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.