जपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:45 AM2021-05-18T06:45:27+5:302021-05-18T06:47:43+5:30

या हॉटेलमधील सगळेच कर्मचारी ‘डिमेन्शिया’ झालेले आहेत. म्हणजे छोट्या-मोठ्या प्रमाणात त्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे.

Japan's 'Restaurant of Mistake Orders'; Come again, they're back to 'wrong order'! | जपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण?

जपानचं 'हे' हॉटेल ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता प्रसिद्ध; तरीही लोकांची प्रचंड गर्दी, काय आहे कारण?

Next

कोरोनामुळे आजकाल हॉटेल्स बंद आहेत ते ठीक, पण एक कल्पना करून पाहायला काय हरकत आहे? - तर कल्पना करा की, हे कोरोना वगैरे सगळं निवळलंय, आपल जीवन पुन्हा पूर्वपदावर आलंय आणि तुम्ही खूप म्हणजे खूपच दिवसांनी तुमच्या आवडत्या हाॅटेलमध्ये गेला आहात... छान जागा शोधून आरामात बसता, गप्पाटप्पा सुरू असतात, छान मंद संगीत सुरू असतं... थोड्या वेळाने मेन्यू कार्ड येतं... तुम्हाला काहीतरी विशेष खाण्याचा मूड असतो, तुमचा वेटर काही खास माहिती देतो, मग बरीच चर्चा करून तुम्ही ‘ऑर्डर’ देता.... आणि थोड्या वेळाने तुमच्या टेबलावर तुमचं जेवण येतं... पण ते असतं भलतंच! म्हणजे तुम्ही ऑर्डर केलाय पदार्थ ए आणि टेबलावर आलाय पदार्थ एस!... पुढे काय होइल? तुम्ही वैतागाल, तुमचा मूड जाईल, तुम्ही वेटरला म्हणाल, ही नाही माझी ऑर्डर!!!
- पण जर का समजा, तुम्ही जपानमध्ये ‘त्या’ हॉटेलात  असाल, तर मात्र मान झुकवून वेटरचे आभार मानाल, शिवाय वर चांगली टीपही द्याल!

जपानच्या टोकियोमध्ये हे हॉटेल आहे. त्याचं नावच ‘रेस्टॉरण्ट ऑफ मिसटेकन ऑर्डर्स्’ असं आहे. म्हणजे समजा, तुम्ही तुमच्या पसंतीची एखादी ऑर्डर दिली, तर तुमच्या पुढ्यात चुकीची किंवा दुसऱ्याचीच थाळी येऊन पडण्याची दाट शक्यता! तरीही या हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी असते आणि वेटरनं ऑर्डर चुकवलेली असली, तरी आपल्या पुढ्यात येईल ते आनंदानं आणि हसत हसत ग्राहक खातात, त्या खाद्यपदार्थांचं पोट भरून कौतुक करतात आणि तिथल्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन प्रसन्न मनाने घरी जातात. पुन्हा येतात, ते परत एकदा ‘चुकीची ऑर्डर’ देण्याकरिता! 

काय विशेष आहे या हॉटेलचं? आणि एवढा मोठा घोटाळा करूनही खाद्यरसिक न चिडता, उलट हॉटेलातल्या लोकांना शाबासकी का देतात? याचं एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे या हॉटेलमधील सगळेच कर्मचारी ‘डिमेन्शिया’ झालेले आहेत. म्हणजे छोट्या-मोठ्या प्रमाणात त्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्यामुळे ऑर्डर चुकण्याचं, चुकविण्याचं प्रमाणही खूप मोठं आहे. तुमचं नशीब जोरावर असेल, तर तुमची ऑर्डर बरोबर येईलही, पण ती चुकण्याची शक्यता जास्त.

खरं तर जपानी संस्कृती प्रत्येक बाबतीत अतिशय काटेकोर समजली जाते. प्रत्येक वेळी तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. समजा, भूतकाळात तुम्ही कधी जपानला गेला असाल किंवा भविष्यकाळात गेलात आणि अशी काही चूक जर एखाद्या हॉटेलात झाली, तर हॉटेलचा मालक ती चूक तक्षणी दुरुस्त तर करेलच, पण तुमची इतक्या वेळा माफी मागेल की, तुम्हालाच लाजल्यासारखं होईल. 
‘रेस्टॉरण्ट ऑफ मिसटेकन आर्डर्स’ मात्र याला अपवाद आहे. जपान हा जगातला सर्वाधिक म्हाताऱ्यांचा देश आहे आणि छोट्या-मोठ्या प्रमाणात स्मृतिभ्रंश झालेल्या लोकांची टक्केवारीही जगात जपानमध्ये सर्वाधिक आहे. या लोकांना सन्मानानं, आनंदानं जगता यावं, त्याचबरोबर, विश्वबंधुत्वाची भावना जगभर पसरावी, या हेतूनं हे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. मध्यमवर्गीय, वृद्ध आणि अगदी शंभरीला टेकलेले कर्मचारीही येथे पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भलंमोठं हसू आणि अतिशय आपुलकीनं प्रत्येक ग्राहकाचं स्वागत. या हॉटेलात ऑर्डर चुकायचं प्रमाण जवळपास ३७ टक्के आहे, म्हणजे याची ऑर्डर त्याला आणि त्याची ऑर्डर दुसऱ्यालाच, असं होणं हे नित्याचंच आहे. हॉटेलनंच हे जाहीर केलेलं आहे, पण ऑर्डर जरी चुकली तरी तुमच्या पुढ्यात आलेला खाद्यपदार्थ शंभर टक्के चविष्ट आणि तुम्हाला खुश करणारा असेल यांची गॅरण्टी. तिथे येणाऱ्या खवय्यांचंही तेच म्हणणं आहे. त्यामुळे ऑर्डर चुकलेली असली, तरी तिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठं हसू असतं आणि एक हलकंफुलकं वातावरण तिथे नेहमीच पाहायला मिळतं. खरं तर जपानी संकेतांच्या हे विरुद्ध, पण तेच त्याचं मोठं वैशिष्ट्यही आहे. जपानी लोकांच्या चेहऱ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर हास्य दिसणं, सगळेच जण एकाच वेळी हसत असणं, एन्जॉय करीत असणं, हे तसं दुर्मीळ दृश्य, पण ते या हॉटेलात पाहायला मिळतं. स्मृतिभ्रंश झालेल्या या निर्मळ लोकांनी जपानमध्ये या निर्मळ, निष्पाप हास्याचाही प्रचार, प्रसार केला आहे.

सामाजिक ऐक्य टिकावं म्हणून...
‘रेस्टॉरण्ट ऑफ मिसटेकन ऑर्डर्स’ या हॉटेलचे संचालक शिरो ओगुनी सांगतात, समाजातला आपला प्रत्येकाचा वावर सहज, सोपा आणि स्वीकारार्ह असला पाहिजे. कुणाला स्मृतिभ्रंश असो नसो, एखाद्या आजारानं कुणाला ग्रासलेलं असो नसो, समाजानं सर्वांनाच प्रत्येक परिस्थितीत स्वीकारलं पाहिजे, समाजातला हा बदल आम्हाला हवा होता, कुठल्याही परिस्थितीत हे ऐक्य टिकून राहायला पाहिजे, हा आमचा हेतू होता. आमचा हा प्रयत्न अपेक्षेबाहेर यशस्वी झाला. त्यामुळेच या हॉटेलला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: Japan's 'Restaurant of Mistake Orders'; Come again, they're back to 'wrong order'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल