जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 20:02 IST2024-11-11T20:02:02+5:302024-11-11T20:02:24+5:30
इशिबा यांनी १ ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी अचानक मतदानाची घोषणा केली होती. पंतप्रधान बनले असले तरी अल्पमतात त्यांना सरकार चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.

जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?
जपानमध्ये दोन आठवड्यांपूर्वीच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) ला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तरी देखील शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले आहेत.
२७ ऑक्टोबरला जपानमध्ये निवडणूक झाली होती. यामध्ये ४६५ सदस्यांच्या सभागृहात एलडीपीने बहुमत गमावले होते. सत्ताधाऱ्यांच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. निकाल लागला तरी ३० दिवसांत नवीन नेता निवड करणे गरजेचे होते. यामुळे सोमवारी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. संसदेत गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच मतदान घेण्यात आले.
यावेळी इशिबा यांनी विरोधी उमेदवार योशिहिको नोडा यांचा पराभव केला. इशिबा यांना २२१ आणि नोडा यांना १६० मते मिळाली. यानंतर इशिबा यांनी गेल्या सरकारचेच मंत्री कायम ठेवले. फक्त तिघेजण पुन्हा निवडून न आल्याने त्यांचे मंत्रिपद बदलण्यात आले आहे.
इशिबा यांनी १ ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी अचानक मतदानाची घोषणा केली होती. पंतप्रधान बनले असले तरी अल्पमतात त्यांना सरकार चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.
इशिबा कसे निवडून आले?
जपानच्या संसदेत खासदारांना आपला पसंतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडण्याची मुभा आहे. यानुसार इशिबा यांच्या पक्षाच्या खासदारांनी २२१ मते दिली, तर विरोधी पक्षाच्या नेत्याला १६० मते पडली. परंतू उरलेली ७६ मते ही त्या खासदारांनी त्यांच्या पसंतीच्या इतर उमेदवारांना दिली. यामुळे इशिबा यांना बहुमत मिळाले व त्यांना विजयी घोषित करण्यात आले.