डोनाल्ड ट्रम्पनंतर आता त्यांच्या जावयाच्या नावाची 'नोबेल शांतता' पुरस्कारासाठी शिफारस; काय आहे कामगिरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:17 PM2021-02-02T13:17:03+5:302021-02-02T13:17:38+5:30
२०२१ या वर्षासाठीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम मूदत आता संपली आहे.
२०२१ या वर्षासाठीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम मूदत आता संपली आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांचे जावई जेराड कुशनर (Jared Kushner) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पश्चिम आशियात शांतता चर्चेला यशस्वीपणे पूर्णरुप दिल्याने या दोघांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
ट्रम्प यांचे जावई जेराड कुशनर हे अमेरिकेतील व्हाइट हाऊसचे माजी सीनिअर अॅडव्हायझर राहिले आहेत. तर डेप्यूटी अॅडव्हायझर अवि बेर्कोविट्स (Avi Berkowitz) यांच्याही नावाची शिफारस नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
जेराड कुशनर यांची कामगिरी काय?
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती तसंच बहारीन या देशांनी ऑगस्ट २०२० मध्ये एका शांतता करारावर स्वाक्षरी केली. या शांतता कराराला अबराम ॲकॉर्ड्स (Abraham Accords) म्हटलं जातं. या करारासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली होती. जागतिक शांततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या शांतता कराराला यशस्वी करण्यात कुशनर आणि अवि बेर्कोविट्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शांतता करार झाला तेव्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार होतं.
डेराड कुशनर आणि अवि बेर्कोविट्स यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे. अमेरिकेतील ॲटर्नी ॲलन डेरशोवित्झ (Alan Dershowitz) यांनी हॉर्वर्ड लॉ स्कूलमधील एमिरिट्स प्राध्यापक या अधिकाराने नोबेल निवड समितीला या दोघांच्या नावांचा नोबेल शांतता पुरस्कारासाठी विचार करण्याची शिफारस एका पत्राद्वारे केली आहे. गेल्यावर्षी तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांच्याविरुद्धच्या पहिल्या महाभियोगावेळी डेरेशोवित्झ यांनी ट्रम्प यांचा बचाव केला होता.
कुशनर यांनी व्यक्त केला आनंद
नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस झाल्याबद्दल आनंद झाल्याचं जेराड कुशनर यांनी पत्रक काढून जाहीर केलं आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहेत.
मागील वर्षी, शांततेचा नोबेल पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र संघाच्या 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'ला जाहीर करण्यात आला होता. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होती.