Iron Man चा अडीच कोटींचा सूट गेला चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 07:50 PM2018-05-10T19:50:44+5:302018-05-10T19:50:44+5:30
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ मध्येही रॉबर्ट डाऊनी आयर्न मॅनच्या भूमिकेत दिसला होता.
लॉस अँजेलिस: हॉलिवूड चित्रपटांतील लोकप्रिय पात्र असलेल्या Iron Man चा सूट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर याने 2008 साली आलेल्या चित्रपटात Iron Man चा हा सूट वापरला होता. लॉस अँजेलिस पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चित्रपटांसाठी पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या गोदामातून हा सूट गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हा सूट शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. यासाठी गुप्तहेरांचे खातेही कामाला लागले आहे.
Iron Man च्या या प्रसिद्ध सूटची किंमत साधारण 2.18 कोटी इतकी होती. 2008 मध्ये रॉबर्ट डाऊनीची प्रमुख भूमिका असलेला आयर्न मॅन प्रदर्शित झाला होता. त्यावेळी डाऊनीने हा सूट परिधान केला होता. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजलाही होता.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ मध्येही रॉबर्ट डाऊनी आयर्न मॅनच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. फक्त १३ दिवसांत चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार करत भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी ३१.३३ कोटींची कमाई करत चित्रपटाने ‘बागी २’ आणि ‘पद्मावत’चा रेकॉर्ड मोडला होता. फक्त चार दिवसातच चित्रपटाने १०० कोटींची कमाई करत आधीच रेकॉर्ड केला होता. ‘इन्फिनिटी वॉर’ हा एमसीव्हीचा फेस १ मधील शेवटचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या पटकथेची सुरूवात २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आर्यनमॅन सिनेमापासून झाली. या चित्रपटानंतर ‘आर्यनमॅन’, ‘अॅवेंजर्स’, ‘थॉर’ असे एकाहून एक सरस तब्बल १५ सिनेमांमधून ‘इनफिनिटी वॉर’ची पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती.