बिल गेट्स नव्हे, आता 'हा' अवलिया आहे या विश्वाचा नवा कुबेर!
By Sagar.sirsat | Published: July 27, 2017 09:37 PM2017-07-27T21:37:09+5:302017-07-27T23:14:17+5:30
जगातील कुबेरांच्या पंक्तीवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणा-या मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स या श्रीमंतांच्या राज्याचे राज्य खालसा
नवी दिल्ली, दि. 27 - जगातील कुबेरांच्या पंक्तीवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणा-या मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स या श्रीमंतांच्या राज्याचे राज्य खालसा झाले आहे. जगाच्या सर्वात श्रीमंतांच्या गादीवर आता नवाच ‘धीश’ येऊन स्वार झाला आहे. हा नवा राजा आहे इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनचे फाउंडर जेफ बेझोस. रोज आपण ज्या वेबसाइटवरून स्वस्तात काही ना काही वस्तू खरेदी करण्याची इच्छा बाळगत असतो अशा अॅमेझॉनच्या मालकाने आता मायक्रोसॉफ्टच्या सर्वेसर्वाला श्रीमंतांच्या क्रमवारीत मागे सोडले आहे.
यासंदर्भात ब्लूमबर्गने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 2013 पासून सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वल असणारे मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना बेझोस यांनी मागे टाकले आहे.
कसे झाले बेझोस सर्वश्रीमंत?
बिल गेट्स यांना मागे टाकणे तसे सोपे नव्हते. पण, अॅमेझॉन कंपनीच्या स्टॉक्समध्ये तेजी आली आणि बेझोस यांनी बिल गेट्स यांना मागे टाकले. गुरूवारी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज सुरू होताच अॅमेझॉनचे शेअर 1.3 टक्क्यांच्या तेजीसह 1,065 डॉलरवर उघडले. त्याचा थेट फायदा बिजोस यांना झाला. अन् त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा बिल गेट्स यांच्यापेक्षा मोठा झाला.
बेझोस यांचा अमेझिंग स्पीड
अॅमेझॉन या वेबसाइटवरून खरेदी करणा-यांची संख्या जशी झपाट्याने वाढते आहे तशीच बेझोस यांची संपत्ती वाढण्याचा स्पीडही अमेझिंग आहे. गेल्या वर्षभरात सर्वात जलदगतीने संपत्तीत वाढ होणा-या अब्जाधीशांपैकी एक अशी बेझोस यांची ओळख आहे. वर्षभरात बेझोस यांची संपत्ती 24.5 अब्ज डॉलरनी (1.28 लाख कोटी रुपये) वाढली आहे. तर बिल गेट्स यांच्या संपत्तीमध्ये केवळ 8.5 अब्ज डॉलरचा नफा झाला आहे.
किती आहे या दोघांची संपत्ती?
अॅमेझॉनचे शेअर्स वधारल्याने बेझोस यांच्या संपत्तीत 1.4 अब्ज डॉलरची भर पडली. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 90.9 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. बिल गेट्सपेक्षा त्यांची संपत्ती अधिक झाली आहे. बिल गेट्स यांची संपत्ती 90.7 अब्ज कोटी असल्याचे ब्लुमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.