कर्दाशियनसारखं दिसण्यासाठी ३० शस्त्रक्रिया; मात्र आता तिला कधीच आई होता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 07:45 AM2024-09-09T07:45:28+5:302024-09-09T07:46:09+5:30

आपण किम कर्दाशियनसारखंच दिसावं यासाठी तिचा सारा आटापिटा होता. त्यासाठी तिनं स्वतःवर वेगवेगळ्या चक्क तीस शस्त्रक्रिया करवून घेतल्या!

Jennifer Pamplona has undergone multiple cosmetic surgeries since the early age of 17 | कर्दाशियनसारखं दिसण्यासाठी ३० शस्त्रक्रिया; मात्र आता तिला कधीच आई होता येणार नाही

कर्दाशियनसारखं दिसण्यासाठी ३० शस्त्रक्रिया; मात्र आता तिला कधीच आई होता येणार नाही

आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी कोण काय करतं, तर कोण काय! त्यातही कोणी एखाद्या सेलेब्रिटीचा चाहता असेल, तर त्याच्यासारखं दिसण्यासाठीही ते जिवाचा आटापिटा करतात. त्याच्यासारखे कपडे घालतात, त्याच्याचसारखी हेअरस्टाइल करतात. एवढंच काय त्याच्याचसारखं बोलतात, चालतात..

किम कर्दाशियन ही एक अमेरिकन अभिनेत्री. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. केवळ तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचेच नाही, तर तिच्या व्यक्तिगत आयुष्यात तिचं काय चाललं आहे, तिनं किती लग्नं केलीत, किती मोडलीत, तिला किती मुलं आहेत... अशा अनेक गोष्टींत अनेकांना रस असतो.

ब्राझीलमध्ये तिची एक चाहती आहे. जेनिफर पॅम्पलोना. ती स्वतः अभिनेत्री आहेच, शिवाय मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे. तिचेही अनेक चाहते आहेत; पण ती स्वतः मात्र किम कर्दाशियनची प्रचंड चाहती. एकीकडे ब्राझीलमधील अनेक तरुणींना जेनिफरचं आकर्षण, तर दुसरीकडे जेनिफरला स्वतःलाच 'प्रति किम कर्दाशियन' बनण्याची प्रचंड हौस. त्यासाठी तिनं काय करावं?...

आपण किम कर्दाशियनसारखंच दिसावं यासाठी तिचा सारा आटापिटा होता. त्यासाठी तिनं स्वतःवर वेगवेगळ्या चक्क तीस शस्त्रक्रिया करवून घेतल्या! आपण किमसारखं दिसावं यासाठी एकही गोष्ट तिनं सोडली नाही. त्यासाठी तिनं आपल्या पार्श्वभागावर 'बट फिलर' शस्त्रक्रियाही करवून घेतल्या. या शस्त्रक्रियांचीही तिला प्रचंड हौस. त्यामुळं ती स्वतःला 'सर्जरी अॅडिक्ट'ही म्हणवून घेते. उद्देश एकच... किम कर्दाशियनसारखं दिसायचं. त्यासाठी तिनं आतापर्यंत चक्क साडेआठ कोटी रुपये खर्च केले आहेत; पण इतका खर्च आणि तब्बल तीस शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला आता कळलंय, जे आपण करतोय, जे इतकी वर्षं केलं, ते चुकीचं आहे, चुकीचं होतं. कारण या शस्त्रक्रियांचा विपरीत परिणाम म्हणून तिला आता कधीच आई होता येणार नाही. शिवाय तिला नियमित ज्या वेदता होताहेत त्या वेगळ्याच.

कॉस्मेटिक सर्जरीसाठी सर्वसाधारणपणे जे मटेरिअल वापरलं जातं, त्या पॉलिमिथाइल मेथैक्रिलेटचा (पीएमएमए) उपयोग जेनिफरच्या शस्त्रक्रियांसाठीही करण्यात आला होता. विशेषतः पार्श्वभागाला उभार आणण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. इंजेक्शननं ते शरीरात सोडण्यात आलं. ते मटेरिअल शरीरात इतर भागांतही विशेषतः पुनरुत्पादक अवयवांमध्येही पसरल्यानं जेनिफरला वंध्यत्व आल्याचं म्हटलं जात आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे, जेनिफरच्या वंध्यत्वाचं पीएमएमए हे अगदी थेट कारण नसलं तरी त्याच्या अयोग्य वापरामुळे आणि प्रतिकूल परिणामांमुळे तिला हा त्रास झाला आहे. आपल्या या उद्योगांमुळं उपरती आलेली जेनिफर आता प्रत्येकाला सांगते आहे, मी मोठी चूक केली. असं काही तुम्ही कोणीही करू नका. माझ्याच अनुभवानं मी शहाणी झाले आहे; पण त्यासाठी खूप मोठी किंमत मला मोजावी लागली आहे.

तिचे सर्जन डॉ. कार्लोस रिओस यांचंही म्हणणं आहे, वैद्यकीय अपघात हा जेनिफरसाठी जीवन किंवा मृत्यूचा विषय बनला आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचं म्हणणं आहे, अनेक जण कुठलाही अट्टहास करतात आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेतात. ज्यांच्याकडं पैसा आहे, सर्व काही विकत घेण्याची क्षमता आहे आणि अडेलतट्ठपणा करण्याची गुर्मी आहे, त्यांना तर किम कर्दाशियनसारखं दिसण्यासाठी जेनिफरनं वयाच्या सतराव्या वर्षापासूनच शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली होती. २०२२ मध्ये 'बॉडी डिस्मॉर्फिया'चं निदान झाल्यानंतरच जेनिफरनं शस्त्रक्रिया करण्याचं थांबवलं. 'बॉडी डिस्मॉर्फिया' हा मानसिक आजाराचा प्रकार आहे. वंध्यत्वापासून सुटका मिळवण्यासाठी जेनिफरला कदाचित आणखी एक मोठी 'पुनर्निर्माण' शस्त्रक्रिया करावी लागणार आहे; पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. सध्या तरी ती डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली आहे. 

जेनिफर म्हणते, शस्त्रक्रियांचा प्रतिकूल परिणाम म्हणून मला ज्या वेदना होताहेत, ज्या परिस्थितीतून मला जावं लागत आहे, ते तर वेगळंच; पण मी आता कधीच आई होऊ शकणार नाही, ही भावनाच मला आता अतिशय अस्वस्थ करते आहे. इतर कोणत्याही वेदनांपेक्षा ही वेदना सर्वाधिक मोठी आहे. मी कायमच आई बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं; पण ते आता कधीच प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. असं काही होईल याची मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती..

Web Title: Jennifer Pamplona has undergone multiple cosmetic surgeries since the early age of 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.