जिगरबाज स्कायडायव्हरची ७.६ किमी उंचीवरून पॅॅराश्यूटविना उडी!

By Admin | Published: August 1, 2016 05:01 AM2016-08-01T05:01:01+5:302016-08-01T05:01:01+5:30

ल्युक ऐकिन्स या ४२ वर्षांच्या जिगरबाज ‘स्कायडायव्हर’ने शनिवारी ७.६ किमी उंचीवरून पॅराश्यूटविना विमानातून खाली उडी मारून ‘स्कायडाडव्हिंग’च्या क्षेत्रात नवा इतिहास रचला.

Jigger skydivar jump from 7.6 km in height without parachutes! | जिगरबाज स्कायडायव्हरची ७.६ किमी उंचीवरून पॅॅराश्यूटविना उडी!

जिगरबाज स्कायडायव्हरची ७.६ किमी उंचीवरून पॅॅराश्यूटविना उडी!

googlenewsNext


लॉस एन्जल्स : ल्युक ऐकिन्स या ४२ वर्षांच्या जिगरबाज ‘स्कायडायव्हर’ने शनिवारी ७.६ किमी उंचीवरून पॅराश्यूटविना विमानातून खाली उडी मारून ‘स्कायडाडव्हिंग’च्या क्षेत्रात नवा इतिहास रचला.
अशा प्रकारच्या १८ हजार उड्यांचा भरभक्कम अनुभव गाठीशी असलेला ल्युक येथून जवळच असलेल्या सिमी खोऱ्यात बिग स्काय मुव्ही रॅन्चमध्ये चहूबाजूंनी ताणून बांधलेल्या १०० फूट बाय १०० फूट आकाराच्या जाळीवर अलगद उतरला तेव्हा हा थरार श्वास रोखून पाहणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
चाहते व प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर व अचंब्याचे चित्कार सुरू असतानाच ल्युक जाळीवरून टुणकन उडी मारून खाली उतरला व त्याने धावत जाऊन आपली पत्नी मोनिका हिला आनंदातिशयाने मिठी मारली. ल्युकने विमानातून उडी मारली तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला होता. तिच्या कडेवर असलेला लोगान हा चार वर्षांचा मुलगा पेंगत होता, त्यामुळे आपल्या वडिलांनी केलेल्या पराक्रमाची त्याला कल्पना आली नाही. ल्युकचे इतर कुटुंबीयही हजर होते. नव्हती फक्त त्याची आई. तिने मनाचा निग्रह करून तेथे येण्याचे टाळले होते.
ल्युकसह एकूण चार ‘स्कायडायव्हर्स’नी विमानातून एकोपाठोपाठ एक उड्या घेतल्या. ल्युक वगळून इतर तिघांच्या पाठीला पॅराश्यूटचे भेंडोळे बांधलेले होते. त्यांच्यापैकी एक जण हातातील कॅमेऱ्याने चित्रीकरण करत होता. दुसरा, जमिनीवरून पाहात असणाऱ्यांना या संपूर्ण उडीचा मागोवा घेणे सोपे जावे यासाठी हातातील नळकांड्यातून धूर सोडत होता. कृत्रिम प्राणवायूची  गरज भासणार नाही एवढ्या उंचीवर खाली आल्यानंतर ल्युकने त्याच्याकडील प्राणवायूचे नळकांडे हात मोकळे असलेल्या तिसऱ्याकडे सुपूर्द केले.
फॉक्स टीव्ही नेटवर्कवर ‘स्ट्राईड गम प्रेशेन्ट्स हेवन सेंट’ या कार्यक्रमात ल्युकच्या या चित्तथरारक उडीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. पराश्यूटविना मारलेली उडी हाच तर या स्टंटमधील खरा थरार होता. पण विमानात चढण्यापूर्वी काही क्षण आधी ल्युकने सुरक्षेसाठी पॅराश्यूट वापरावे, असा संदेश स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्डकडून दिला गेला. ऐनवेळी माघार घेण्याचा विचार ल्युकच्या मनाला क्षणभर चाटून गेला. पॅराश्यूट पाठीला बांधलेले असले तरी ते उघडणे वा न उघडणे आपल्या हाती आहे. तेव्हा पॅराश्यूट असले तरी ते न उघडताच उडी मारावी, असा ल्युकने विचार केला. परंतु पाठीवर पॅराश्यूटचे भेंडोळं घेऊन एवढ्या उंचीवरून जाळीत पडलो तर हाडे पार मोडून जातील, हेही त्याच्या लक्षात आले.
जे काही व्हायचे ते नंतर पाहून घेऊ, पण काहीही झाले तरी मी पॅराश्यूट न उघडता थेट जाळीतच उडी मारणार, असे सहकाऱ्यांना सांगून ल्युक विमानातून उडी मारणार तेवढ्यात त्याला पॅराश्यूट वापरण्याचे बंधन हटविण्यात आल्याचा नवा संदेश मिळाला आणि क्षणाचाही विचार न करता तो पॅराश्यूटविना विमानातून बाहेर झेपावला.
दोन वर्षांपूर्वी क्रिस टॅली या मित्राने अशा प्रकारच्या उडीची कल्पना मांडली तेव्हा ल्युकने सुरुवातीस त्यासाठी तयारी दर्शविली नव्हती. काही आठवडयांनी मात्र ऐकिन्सने टॅलिला आपली तयारी असल्याचे कळविले होते. त्यानंतर डझनावारी मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या मदतीने दोन वर्षे जय्यत तयारी करून ल्युकने शनिवारी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखविली. (वृत्तसंस्था)
>उडी घेण्यापूर्वी क्षणभर मनात धाकधूक झाली होती, असे ल्युकने सांगितले. पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला की, मी थरथरत होतो. हे सर्व विस्मयकारी होते. हे सर्व कसे जमले ते मला तोंडाने सांगता येणार नाही, पण घडले मात्र खरे!
>कुटुंबातच पिढीजात जिगर
ल्युकने आकाशातून पहिली सामूहिक उडी वयाच्या
१२व्या वर्षी मारली.
त्यानंतर चार वर्षांनी त्याने एकट्याने उडी मारली.
त्यानंतर दरवर्षी तो उडी घेण्याचे अंतर काही शे फुटांनी वाढवत राहिला.
सन २०१२मध्ये फेलिक्स
बॉमगार्टनर याने पृथ्वीपासून २४ मैल उंचीवरून आवाजाहून अधिक
वेगाने खाली उडी मारण्याचा विक्रम केला तेव्हा ल्युक त्याचा ‘बॅक अप जंपर’ होता.
ल्युकचे वडील व आजोबाही स्कायडायव्हर होते.
त्याची पत्नीही स्कायडायव्हर असून, तिनेही दोन हजार उड्या मारलेल्या आहेत.
वॉशिंग्टनजवळ टॅकोमा येथे ऐकिन्स कुटुंबाची स्कायडायव्हिंग प्रशिक्षण कंपनी आहे.
ल्ुयक अमेरिकेच्या पॅराश्यूट असोसिएशनचा सुरक्षा व प्रशिक्षण सल्लागार आहे. तो नवखे विद्यार्थी व प्रशिक्षक अशा दोघांनाही प्रशिक्षण देतो.
अमेरिकेच्या सुरक्षा दलांतील खास तुकड्यांचाही ल्युक प्रशिक्षक आहे.

Web Title: Jigger skydivar jump from 7.6 km in height without parachutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.