‘जैश’चा म्होरक्या मसूद जेरबंद !

By admin | Published: January 14, 2016 04:25 AM2016-01-14T04:25:31+5:302016-01-14T04:25:31+5:30

भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावरील हल्ल्यामागचा प्रमुख सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर

'Jism' leader, Masood Zerband! | ‘जैश’चा म्होरक्या मसूद जेरबंद !

‘जैश’चा म्होरक्या मसूद जेरबंद !

Next

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावरील हल्ल्यामागचा प्रमुख सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर आणि त्याच्या भावाला पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. या वृत्ताला निवृत्त लेफ्ट. जनरल अब्दुल कादिर बलूच यांनी दुजोरा दिला आहे.
मसूद व त्याच्या भावाला सुरक्षात्मक कोठडीत ठेवण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिले. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी भारतासोबतच्या सहकार्याची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता असल्यामुळे पाकिस्तान पठाणकोटला विशेष चौकशी पथक पाठविण्याचाही विचार करीत आहे.
परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेवर असलेल्या अनिश्चिततेच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन पठाणकोटप्रकरणी पाकने उचललेल्या पावलांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पाकच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पठाणकोट हल्ल्याशी कथितरीत्या संबंधित दहशतवादी घटकांविरुद्धच्या चौकशीत उल्लेखनीय प्रगती करण्यात आली आहे. भारताने पुरविलेली माहिती तसेच पाकमधील प्राथमिक चौकशीच्या आधारे जैश ए मोहंमदशी संबंधित अनेकांना अटक करण्यासह जैशची कार्यालये शोधून त्यांना टाळे ठोकण्यात आले आहे.
भारत-पाकची परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा शुक्रवारी व्हायची आहे. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकच्या तत्पर आणि निर्णायक कारवाईवरच या चर्चेचे भवितव्य अवलंबून असेल, असा निर्वाणीचा इशारा भारताने दिल्यानंतर पाकने तडकाफडकी ही कारवाई केली. या चर्चेबाबत गुरुवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

त्या अधिकाऱ्याच्या कारमध्ये चिनी वायरलेस...
पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक उलगडा झाला आहे. दहशतवाद्यांनी पसार केलेल्या पंजाबच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कारमध्ये चिनी बनावटीचे वायरलेस (बिनतारी संदेश यंत्र) आढळले आहे. हीच कार दहशतवाद्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री पळवून वायूदलाचा हवाई तळ गाठला होते.

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) या कारमध्ये चिनी बनावटीचा वायरलेस सेट आढळला. या वायरेलस यंत्रातील माहिती वगळण्यात आलेली असून, हे उपकरण चंदीगडस्थित सीएफएसएलकडे (केंद्रीय न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळा) तपासणीसाठी पाठविले आहे.
या यंत्रातील माहिती पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेचे तज्ज्ञ व सीएफएसएलचे तज्ज्ञ संयुक्तपणे तपासणी करणार आहेत. त्या रात्री
ही कार हवाईतळापासून काही अंतरावर सोडून दहशतवादी हवाईतळ परिसरात घुसले होते.
मागच्या वर्षी साम्बा येथील हल्लाच्या ठिकाणी २० मार्च रोजी अशाच प्रकारचे वायरलेस यंत्र सापडले होते, असेही या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची आज तिसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली.

कोणत्याही आव्हानासाठी लष्कर पूर्ण सज्ज...
सरकारने दिलेली कोणतीही मोहीम समर्थपणे पार पाडण्यास भारतीय लष्कर सज्ज आणि सक्षम आहे, असे लष्करप्रमुख दलबिरसिंग सुहाग यांनी म्हटले आहे. सध्याची सुरक्षा परिस्थिती अत्यंत जटील आणि आव्हानात्मक बनत चालली आहे. पाकव्याप्त काश्मिरात पूर्वी ४२ दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालत. आता किमान १७ शिबिरे चालत आहेत. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय दबावामुळे काही शिबिरे बंद करण्यात आली, असे सुहाग यांनी सांगितले.

पाकिस्तान दहशतवादाचे आश्रयस्थान बनेल...
वॉशिंग्टन : धर्म आणि वंश या मुद्द्यावरून कोणालाही लक्ष्य करणाऱ्या राजकारणाला स्वीकारू नका, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी केले. दहशतवादाच्या नव्या कारवायांसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान व मध्यपूर्व सुरक्षित आश्रयस्थाने बनू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: 'Jism' leader, Masood Zerband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.