JNU Attack : दीपिका पादुकोणच्या JNU भेटीवर पाकच्या मेजर जनरलचं ट्विट, पण लगेच केलं डिलीट!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 03:11 PM2020-01-08T15:11:24+5:302020-01-08T15:13:00+5:30
JNU Protest : दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीचे जोरदार समर्थन केले.
नवी दिल्ली - अभिनेत्री दीपिका पादुकोणनं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यावेळी तिनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दीपिकाने अचानक जेएनयूत पोहोचत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी कन्हैया कुमारही दीपिकासोबत दिसल्याने हा चर्चेचा विषय ठरला. दीपिकाच्या या भूमिकेच पाकिस्तानच्या मेजर जनरल असिफ गफूर यांनी स्वागत केलं आहे.
दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीचे जोरदार समर्थन केले. तर, काहींनी यावरून दीपिकाला लक्ष्य करत तिच्या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. भाजपाचे नेते आणि समर्थकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दीपिकाची जेएनयू परिसरातील उपस्थिती राजकीय स्वरुपाची असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. तर काहींनी हा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं म्हटलं. मात्र, दीपिकाच्या या भूमिकेचं थेट पाकिस्तानमधून कौतुक करण्यात आलंय.
पाकिस्तानचे मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विट करुन दीपिकाने घेतलेल्या भूमिकेबद्दल तिचे कौतुक केलं. तसेच, तरुणाई आणि सत्य यांसोबत उभारल्याबद्दल शाबास दीपिका. कठीणप्रसंगी जो हिंमत दाखवतो, त्यालाच सन्मान भेटतो. मानवता हीच सर्वात मोठी आहे, असे ट्विट गफूर यांनी मध्यरात्री केले होते. मात्र, या काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट करून टाकले. सध्या त्यांचे हे ट्विट ट्विटरवर उपलब्ध नाही, पण त्यांच्या या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आंदोलनावेळी फडकविण्यात आलेल्या Free Kashmir या फलकबाजीवरुनही गफूर यांनी ट्विट केलं आहे.
जम्मू आणि काश्मीरसह, आसाम आणि संपूर्ण भारतात ... असे ट्विट गफूर यांनी केले होते. तसेच, काश्मीर पाकिस्तानचा आहे, असा हॅशटॅगही त्यांनी दिला होता.
दरम्यान, आपण निर्भीडपणे आपलं मत मांडत आहोत, हे पाहून मला अभिमान वाटतो, असं दीपिकानं जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं. लोक समोर येऊन आणि कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवत आहेत. हा निर्भीडपणा कौतुकास्पद आहे, असंही दीपिका म्हणाली.