बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:51 IST2025-01-18T11:51:14+5:302025-01-18T11:51:43+5:30
Joe Biden, America H1-B Visa Rules Changed : जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून जाता-जाता व्हिसा प्रक्रियेत एक मोठा बदल केला आहे. मोठ्या संख्येने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर या बदलाचा नक्कीच परिणाम होणार आहे.

बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार?
Joe Biden, America H1-B Visa Rules Changed : अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत. याआधी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाता-जाता एक मोठा बदल केला आहे. बायडेन यांनी H-1B व्हिसासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांचा भारतीय लोकांना खूप फायदा होणार आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या व्हिसा धोरणात केलेली ही शेवटची सुधारणा असेल.
H-1B व्हिसा घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचा टक्का सर्वाधिक आहे. २०२३ मध्ये दिलेल्या ३ लाख ८६ हजार व्हिसांपैकी ७२ टक्क्यांहून अधिक व्हिसा भारतीयांना देण्यात आले होते. H-1B व्हिसा असलेले लोक त्यांच्या देशात न परतता त्यांच्या व्हिसाचे नूतनीकरण करू शकणार आहेत. त्यामुळे तेथील परदेशी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन नियमांचा भारतीयांवर कसा परिणाम?
- H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर आता हा व्हिसा मिळविण्यासाठी कोणत्याही विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमाची गरज भासणार नाही. यामध्ये थेट नोकरीशी संबंधित अशा ऐच्छिक पदवी अभ्यासक्रमांनाही मान्यता देण्यात आली आहे.
- नवीन नियमांनुसार लॉटरी प्रक्रियेत निष्पक्षता राखली जाईल. त्यासोबतच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जेणेकरून व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना ते सोपे होईल.
- F-1 व्हिसावर अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी H-1B व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
- व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर प्रक्रिया वेगवान होणार आहे. जेणेकरून लोकांना लवकर व्हिसा मिळू शकेल.
- नवीन नियमानुसार, कंपन्या त्यांच्या गरजेनुसार अधिक तज्ज्ञ लोकांना नियुक्त करू शकतील.
- तपासणीदरम्यान माहितीची पडताळणी न झाल्यासच H-1B व्हिसाचा अर्ज फेटाळला जाऊ शकेल.
- नियमांचे अधिक चांगल्या प्रकारे पालन करण्यासाठी नवीन तयार केलेला फॉर्म I-129 १७ जानेवारी २०२५ पासून अनिवार्य असेल.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर अनेकदा टीका केली आहे. मात्र, नुकतेच त्यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे एलोन मस्क यांनी या व्हिसाचे कौतुक केले होते. त्यानंतर या व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प यांची भूमिकाही मवाळ झाली. त्यामुळे ट्रम्प आल्यानंतर त्यात कोणताही बदल होणार नाही किंवा तो रद्द केला जाणार नाही, असे मानले जात आहे.