जो बायडेन वृद्ध, अमेरिकेला सांभाळण्यास सक्षम नाहीत; हुकूमशहा किम जोंगच्या बहिणीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 05:59 AM2023-04-30T05:59:52+5:302023-04-30T06:00:29+5:30
अमेरिका आणि दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या करारानुसार अमेरिका आपली आण्विक पाणबुडी दक्षिण कोरियाला पाठविणार आहे.
प्योंगयांग - अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यातील अणुकरारानंतर उत्तर कोरिया खवळला असून, हुकूमशहा किमची बहीण किम यो जोंग यांनी देश आपल्या लष्करी सामर्थ्याचे अधिक प्रदर्शन करणार असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी जो बायडेन यांच्या अमेरिकी अध्यक्षपदाचे शिवधनुष्य उचलण्याच्या क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन आता वृद्ध व कमजोर झाले असून, अमेरिकेच्या सुरक्षेची आणि भविष्याची जबाबदारी घेण्यास ते सक्षम नाहीत. त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करणेही खूप कठीण आहे. असे यो जोंग म्हणाल्या.
अमेरिका-दक्षिण कोरियात करार
अमेरिका आणि दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या करारानुसार अमेरिका आपली आण्विक पाणबुडी दक्षिण कोरियाला पाठविणार आहे. त्यावर यो जोंग यांनी टीका करताना सांगितले की, अमेरिका आणि दक्षिण कोरियातील करार हा याचा पुरावा आहे की ते आमच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा अवलंबू इच्छितात. या कराराने आमचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आम्हाला अणुयुद्धासाठी आपले सुरक्षाकवच अधिक भक्कम करावे लागेल.