बायडेन कर्जात अडकले! ऑस्ट्रेलियाने क्वाडची बैठक रद्द केली, तरीही मोदी जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 09:12 AM2023-05-17T09:12:05+5:302023-05-17T09:13:22+5:30
बायडन यांनी दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियाई सरकार उरलेल्या दोन देशांशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले होते.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पुढील आठवड्यात होणारी क्वाड देशांची बैठक रद्द झाल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या बैठकीला येऊ शकत नसल्याने ऑस्ट्रेलियाने ही बैठक रद्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात या बैठकीला जाणार होते.
बायडेन सध्या अमेरिकेतील कर्जामुळे आलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा सोडविण्यात व्यस्त आहेत. यामुळे त्यांनी पुढील आठवड्यातील परदेश दौरे रद्द केले आहेत. क्वाड देशांच्या बैठकीला अमेरिका नसली तरी भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया उपस्थित राहू शकतात, असे अल्बानीज यांनी आधी म्हटले होते. बायडन यांनी दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियाई सरकार उरलेल्या दोन देशांशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले होते.
परंतू, आज त्यांनी माफी मागितली आहे. क्वाडची पुढील आठवड्यातील बैठक रद्द केल्याचे सांगून पुढील तारखा घेत असल्याचे ते म्हणाले. भारत आणि जपानने या बैठकीची तारीख बदलून लवकरात लवकर घेण्यास सांगितली आहे. क्वाड़ बैठक रद्द झाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पुढील आठवड्यातील नियोजित द्विपक्षीय बैठक होऊ शकते. यासाठी भारताकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याचा कार्यक्रम काय?
जपानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी 19 ते 21 मे दरम्यान हिरोशिमा, जपानला भेट देणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून ते जपानला भेट देत आहेत. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान जी-7 सत्रांना संबोधित करतील. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह अन्य काही नेत्यांचाही समावेश असणार होता. यानंतर पीएम मोदींचा पापुआ न्यू गिनीला जाण्याचा विचार आहे. यापूर्वी या दौऱ्यातही बायडेन पीएम मोदींसोबत राहण्याची शक्यता होती. मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर मोदी एकटेच पापुआ न्यू गिनीला भेट देऊ शकतात. पापुआ न्यू गिनीला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल.