जो बायडन अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष, युद्धाचीही शक्यता; चीनच्या सल्लागारांची टीका
By मोरेश्वर येरम | Published: November 23, 2020 03:23 PM2020-11-23T15:23:56+5:302020-11-23T15:28:34+5:30
जो बायडन अध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारतील अशी अपेक्षा चीन सरकारने ठेवू नये.
बीजिंग
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष असल्याची टीका चीनच्या सरकारचे सल्लागार झेंग योंननियान यांनी केली आहे.
जो बायडन अध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारतील अशी अपेक्षा चीन सरकारने ठेवू नये. बायडन यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चीनने कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा झेंग योंननियान यांनी दिला आहे.
इतकंच नव्हे, तर अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आगामी काळात बिघडू शकतात. त्यामुळे उभय देशांमध्ये युद्धदेखील होऊ शकतं, असंही ते पुढे म्हणाले. झेंग योंननियान सध्या 'अॅडवान्स इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल अँड कंटेंम्पररी चायना स्टडीज या संस्थेचे' डीन म्हणून काम पाहातात. दीर्घकालीन धोरण ठरविण्यासाठी झेंग हे चीन सरकारची मदत करतात.
जो बायडन अमेरिकेतील जनतेच्या भावनांच्या फायदा उठवू शकतात. पण अमेरिकेतील समाज दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे बायडन काही करू शकणार नाहीत, असं झेंग म्हणाले.
'बायडन हे अतिशय कमजोर नेते असून ते अमेरिकेतील अंतर्गत मुद्दे देखील सोडवू शकणार नाहीत. ट्रम्प हे लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या विरोधात असतात असं जरी आपण मानलं तरी ते युद्ध करण्याठी तयार झाले नसते. पण डेमोक्रॅटीक पक्षाचे अध्यक्ष युद्ध पुकारू शकतात', असं रोखठोक मत झेंग यांनी यावेळी व्यक्त केलं.
ट्रम्प यांच्या कालखंडात अमेरिका आणि चीनमधील संबंध विविध कारणांमुळे ताणले गेले. यात कोविड-१९ चा उद्रेक, व्यापार आणि मानवी हक्क या गोष्टींचा समावेश आहे. अमेरिकेत डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन या दोघांकडूनही चीनला लक्ष्य करणारी जवळपास ३०० अधिक विधेयकं आजवर मंजुर झाली आहेत. चीनच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांनीही आगामी काळात बायडन यांच्या अध्यक्षतेतही चीन आणि अमेरिकेतील संबंध हे असेच तणावपूर्ण राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे.