जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:15 AM2021-01-28T02:15:54+5:302021-01-28T07:17:10+5:30
एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना दिलासा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने घेतलेल्या ताज्या निर्णयामुळे अमेरिकेत काम करीत असलेल्या एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवन-बीधारक पती किंवा पत्नीचा नोकरीचा परवाना रद्द केला होता, तो बायडेन यांनी मागे घेतला. नियाेजित नियमाचा आढावा ऑफिस ऑफ मॅनेजमेंट आणि बजेट आणि ऑफिस ऑफ इन्फर्मेशन ॲण्ड रेग्युलेटरी अफेअर्स घेत आहे.
अमेरिकेच्या होमलॅण्ड सिक्युरिटीने ट्रम्प प्रशासनाने एचवन-बी व्हिसाधारकाची पत्नी किंवा पतीला ठरावीक वर्गातील रोजगार वा नोकरी करण्याचा रद्द केलेला निर्णय औपचारिकरीत्या मागे घेतला आहे. एचवन-बी व्हिसाधारकाची पत्नी किंवा पतीला एच फोर व्हिसा मिळतो आणि काही मोजक्याच प्रकरणांत पती किंवा पत्नी रोजगाराचा अधिकार मिळण्यासाठीच्या दस्तावेजासाठी अर्ज करू शकते. वर्क परमिट सामान्यत: एच फोर व्हिसाधारकांना दिले जाते जेव्हा त्यांचा एचवन-बी पत्नी किंवा पती कायमस्वरूपी निवासीचे कार्ड प्राप्त करण्याच्या मार्गावर असते. याला ग्रीन कार्डही म्हणतात. परंतु, काही दशकांपासून ग्रीन कार्डचा अनुशेष राहिला असून, हजारो कुटुंबांचा एकाच्याच उत्पन्नावर जीवन जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. हे असे प्रश्न सोडवण्यासाठी बराक ओबामा प्रशासनाने एच फोर एम्प्लॉयमेंट ॲथॉरायझेशन डाॅक्युमेंट नियम २०१५ मध्ये बनवला होता.
कमला हॅरिस यांनी घेतला होता जोरदार आक्षेप
ट्रम्प प्रशासनाने प्रोग्रॅम रद्द करण्यासाठी ठोस पावले उचलली. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस या तेव्हा कॅलिफोर्नियात सिनेटर होत्या. त्यांनी या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला होता. हॅरिस फेब्रुवारी २०१९ मध्ये ट्विटरवर म्हणाल्या होत्या की, “निर्णयाने स्थलांतरित डॉक्टर्स, वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांना त्यांचा व्यवसाय करिअर सोडणे भाग पडेल. तो निर्णय मागे घेण्यात यावा. त्याच्याविरोधात माझा लढा सुरूच राहील.”