ज्यो बायडेन यांच्या पत्नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 05:29 PM2024-11-12T17:29:48+5:302024-11-12T17:31:38+5:30
खरे तर, हे निमंत्रण नाकारण्यामागे, मेलानिया या बायडेन दाम्पत्यावर नाराज असल्याचे कारण सांगितले जात आहे...
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. यानंतर, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी अर्थाता राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल यांनी, डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना औपचारिक भेटीसाठी आणि चहापानासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. मात्र मेलानिया यांनी त्यांचे हे निमंत्रण नाकारले आहे.
खरे तर, हे निमंत्रण नाकारण्यामागे, मेलानिया या बायडेन दाम्पत्यावर नाराज असल्याचे कारण सांगितले जात आहे. कारण, 2022 मध्ये, एफबीआयकडून त्याच्या फ्लोरिडातील निवासस्थानाची झडती घेण्यात आली होती. तेव्हापासूनच त्या या दाम्पत्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
द न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मेलानिया यांनी जिल बायडेन यांच्यासोबत, अशी कुठल्याही प्रकारची भेट नाकारली आहे. खरेतर, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर, जाणाऱ्या आणि व्हाइट हाऊसमध्ये नव्याने येणाऱ्या फर्स्ट लेडी यांच्यात औपचारिक परिचयाची परंपरा आहे. यामुळे, जिल बायडेन यांनी तीच परंपरा पुढे सुरू ठेवण्याच्या उद्देशाने मेलानिया यांना आमंत्रण पाठवले होते. मात्र, मेलानिया यांनी भेटण्यास नकार दिला आहे.
द न्यूयॉर्क पोस्टच्या मते, जिल यांचे पती राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एफबीआयला ट्रम्प यांच्या घराच्या झडतीचे आदेश दिले होते. या झडतीत एफबीआयने त्यांच्या अंडरवेअर ड्रॉवरचीही झडती घेतली होती. यामुळे मेलानिया नाराज आहेत.
महत्वाचे म्हणजे, 2016 मध्ये राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांनी दिलेले निमंत्रण मेलानिया यांनी स्वीकारले होते आणि त्या चहा-पाणासाठी व्हाइट हाऊसमध्ये गेल्या होत्या. मात्र, 2020 मध्ये ट्रम्प दाम्पत्याने ही परंपरा पाळली नव्हती.