जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येपूर्वी ब्रिटिश वृत्तपत्राला आला होता रहस्यमय फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 11:01 PM2017-10-27T23:01:45+5:302017-10-27T23:30:50+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपतींपैकी एक असलेल्या जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येपूर्वी एका...
लंडन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपतींपैकी एक असलेल्या जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येपूर्वी एका ब्रिटिश वृत्तपत्राला या संदर्भात इशारा देणारा फोन आला होता. केनेडी यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी काही मिनिटे आधी आलेल्या या फोन कॉलमधून अमेरिकेतून मोठी बातमी येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येसंदर्भातील नव्याने सर्वांसमोर आलेल्या कागदपत्रांमधून हा खुलासा झाला आहे.
जॉन एफ. केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेतील डल्लास येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येसंदर्भातील काही कागदपत्रे आता सार्वजनिक झाली आहेत. या कागदपत्रांमध्ये सीआयएकडून एफबीआयच्या संचालकांना पाठवण्यात आलेल्या पत्राचा समावेश आहे. या पत्रामध्ये केनेडी यांची हत्या होण्यापूर्वी केंब्रिज न्यूज या वृत्तपत्राला २२ नोव्हेंबर रोजी आलेल्या रहस्यमय फोनकॉलचा उल्लेख आहे. केंब्रिज न्यूजच्या वार्ताहराने एका मोठ्या बातमीसाठी अमेरिकेच्या लंडनमधील वकीलातीशी संपर्क साधावा, एवढी माहिती देऊन हा फोनकॉल कट झाला, असा उल्लेख सीआयएचे उपसंचालक जेम्स अंग्लेटोन यांनी या कॉलबाबत माहिती देताना नमूद केले आहे दरम्यान, ब्रिटनच्या एमआय५ गुप्तहेर संघटनेने हा फोन केनेडी यांची हत्या होण्यापूर्वी २५ मिनिटे आधी आल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
केनेडी हे अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी १९६१ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीदरम्यान अमेरिका आणि रशियामधील शितयुद्ध निवळण्यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान, २२ नोव्हेंबर १०६३ रोजी केनेडी यांच्या झालेल्या हत्येमुळे तेव्हा संपूर्ण जग हादरले होते.