सुप्रसिद्ध McAfee अँटीव्हायरस कंपनीच्या संस्थापकाची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 09:11 AM2021-06-24T09:11:20+5:302021-06-24T09:11:20+5:30
अमेरिकेच्या उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरू म्हणून ओळख असलेल्या जॉन मॅकॅफी यांनी बुधवारी तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अमेरिकेच्या उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरू म्हणून ओळख असलेल्या जॉन मॅकॅफी यांनी बुधवारी तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅकॅफी यांचे वकील झेव्हीयर विलालबास यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे. जॉन मॅकॅफी यांनी स्पेनच्या कोर्टानं मॅकॅफी यांच्या अमेरिकेत प्रत्यापर्णाला मंजुरी दिली होती. त्यानंतर नैराश्यानं ग्रासलेल्या मॅकॅफी यांनी आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं आहे.
दरम्यान, मॅकॅफी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांविरोधात अपील करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर होता आणि तुरुंगात राहणं मॅकॅफी यांना जमत नव्हतं. तुरुंग प्रशासन मॅकॅफी यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहेत.
मॅकॅफी यांनी १९८७ साली जगातील पहिला व्यावसायिक अँटीव्हायरस लाँच करण्याआधी नासा, जिरॉक्स, लॉकहीड मार्टिनसारख्या संस्थांसोबत काम केलं आहे. मॅकॅफी यांनी २०११ साली 'इंटेल' ही त्यांची सॉफ्टवेअर कंपनी विकली होती. त्यानंतर सॉफ्टेवेअर क्षेत्रातून त्यांनी माघार घेतली होती. पण अँटीव्हायरस क्षेत्रात ७५ वर्षीय मॅकॅफी नावाजले गेले. त्यांच्यावर करचोरीचा आरोप करण्यात आला होता. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर क्रिप्टोकरंसी प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप केला गेला. त्यानंतर मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावर ऑक्टोबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती.