CoronaVirus: दोन अमेरिकन कंपन्या मोठ्या प्रमाणात लस तयार करणार; कोरोनाला रोखण्यात यश येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:20 PM2020-03-31T12:20:38+5:302020-03-31T12:22:10+5:30
जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्ना कंपन्यांसोबत अमेरिकन सरकारचा करार
वॉशिंग्टन: कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून सध्या अमेरिका या विषाणूचा केंद्रबिंदू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेन सरकारनं जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्ना कंपन्यांशी करार केला आहे. कोरोना आटोक्यात आणणाऱ्या सुरक्षित आणि कार्यक्षम लसींचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोर्डना कंपन्या लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहेत. यामुळे कोरोनाला रोखण्यात यश येऊ शकतं. याशिवाय आणखी दोन कंपन्यांसोबत अमेरिकन सरकार करार करणार आहे.
कोरोना विषाणूला आळा घालणारी लस अद्याप तरी जगभरातल्या शास्त्रज्ञांना सापडलेली नाही. सध्या जगभरात कोरोनाचे पावणे आठ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर ३७ हजारांपेक्षा अधिक जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. चीन, युरोप पाठोपाठ आता अमेरिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारनं जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्ना कंपन्यांशी करार केला आहे.
कोरोनावरील सुरक्षित लस तयार होण्यासाठी पुढील वर्ष उजाडेल. तोपर्यंत तयार होणाऱ्या लसींची लाखो लोकांवर चाचणी घेण्यात येईल. काल जॉन्सन अँड जॉन्सननं अमेरिकेन सरकारसोबत १ बिलियन डॉलरचा करार करत असल्याची घोषणा केली. कंपनी १ बिलियन लसींचं उत्पादन करणार आहे. या घोषणेनंतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या समभागांची किंमत ८ टक्क्यांनी वधारली. जॉन्सन अँड जॉन्सन सप्टेंबरनंतर लसीची चाचणी सुरू करेल.
मोडर्ना कंपनीनं याच महिन्याच्या सुरुवातीला काही व्यक्तींवर लसीची चाचणी घेतली. मोडर्नानं अमेरिकन सरकारच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या बायोमेडिकल ऍडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑथरिटीसोबत (बार्डा) करार केला आहे. यानंतर मोडर्नाच्या समभागांच्या किमतीत १.४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. कोरोनावर लवकरात लवकर लस शोधली जावी यासाठी अमेरिकन सरकारनं जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्नासोबत करार केले आहेत.