पत्रकारांना लेखनाबद्दल तुरुंगात धाडू नये; संयुक्त राष्ट्रे मोहम्मद झुबेर यांच्या अटकेबाबत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:16 AM2022-06-30T11:16:29+5:302022-06-30T11:16:49+5:30
२०१८ साली धार्मिक भावना दुखावणारे ट्वीट केल्याच्या आरोपांवरून मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
संयुक्त राष्ट्रे : पत्रकार करत असलेले लेखन, ट्वीट किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडू नये, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना झालेल्या अटकेसंदर्भात हे मत व्यक्त करण्यात आले. लोकांचे भाषण, विचारस्वातंत्र्य जपले जावे. त्यांना कोणीही धमक्या देऊ नयेत, अशी अपेक्षाही संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली.
२०१८ साली धार्मिक भावना दुखावणारे ट्वीट केल्याच्या आरोपांवरून मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईबाबत गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे की, सर्व लोकांचे भाषण व विचारस्वातंत्र्य जपले जाईल, याची काळजी प्रत्येक देशाने घेतली पाहिजे. पत्रकारांच्या लेखन, वक्तव्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडणे अयोग्य आहे. मोहम्मद झुबेर यांना झालेल्या अटकेबाबत पाकमधील एका पत्रकाराने दुजारिक यांना प्रश्न विचारला होता. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर खोटे पुरावे सादर करणे, फसवणूक तसेच गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखणे, या आरोपांखाली तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलिसांनी अटक केली होती. या अटकेवरून सामाजिक वर्तुळात माेठी खळबळ उडाली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी असून संताप व्यक्त केला आहे.
‘ते’ ट्विटर अकाउंट गायब
मोहम्मद झुबेर यांना चार वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटप्रकरणी अटक करण्यात आली. एका ट्विटर युजरने दिल्ली पोलिसांना टॅग करून केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, सोमवारी झुबेर यांना अटक झाल्यापासून मात्र ज्या ट्विटर खातेदाराच्या तक्रारीच्या आधारे कारवाई झाली ते खातेच ट्विटरच्या प्लॅटफॉर्मवरून गायब झाल्याचे समोर आले आहे.