म्हणून न्यायमूर्तींनी दिले आरोपीच्या तोंडाला टेप लावण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:05 PM2018-08-06T16:05:03+5:302018-08-06T16:08:50+5:30
न्यायमूर्तींनी आरोपीच्या तोंडाला टेप लावण्याचे आदेश दिल्याचे कधी वाचले आहे का?, नाही ना. पण असा प्रकार घडला आहे.
ओहियो - न्यायमूर्ती आरोपीला तुरुंगवास, आर्थिक दंड अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावतात हे तुम्हाला माहितच असेल. पण न्यायमूर्तींनी आरोपीच्या तोंडाला टेप लावण्याची शिक्षा सुनावल्याचे कधी वाचले आहे का?, नाही ना. पण असा प्रकार घडला आहे. अमेरिकेतील ओहियो येथील एका न्यायालयातील न्यायमूर्तींनी एका आरोपीच्या तोंडाला टेप लावण्याचा अजब आदेश दिल्याचे समोर आले आहे.
त्याचे झाले असे की, ओहियो येथील न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना आरोपी फ्रँकलिन विल्यम्स हा बडबड करत होता. न्यायमूर्ती जॉन रसो यांनी वारंवार बजावूनही तो शांत बसला नाही. त्यामुळे संतापलेल्या न्यायमूर्तींनी या आरोपीचे तोंड टेप लावून बंद करण्याचे आदेश दिले.
विल्यम्स हा लुटीच्या तीन प्रकरणातील आरोपी आहे. त्याला डिसेंबर 2017 रोजी दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात विल्यम्स हा तुरुंगातून पसार झाला होता. मात्र जुलै महिन्यात त्याला पुन्हा पकडण्यात आले. त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार होती. त्या सुनावणीवेळीच विल्यम्सने न्यायालयात बडबड सुरू केली होती. अखेर न्यायमूर्तींनी त्याचे तोंड टेप लावून बंद करण्याचे आदेश देऊन सुनावणी पुरी केली. तसेच विल्यमला 24 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.