तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 05:32 AM2023-10-24T05:32:40+5:302023-10-24T05:32:54+5:30
कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क : समाजाच्या तळागाळातील वर्गाबाबत न्यायव्यवस्थेने दुर्दैवाने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या मोठे नुकसान सोसावे लागले आहे, असे पररखड मत भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या वॉल्थम येथील ब्रँडीस विद्यापीठात चंद्रचूड यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चिरंतन वारसा’ या विषयावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बीजभाषण केले. ते म्हणाले की, उपेक्षित सामाजिक घटकांसंदर्भात भयंकर गंभीर चुका करण्यात आल्या. पूर्वग्रह, भेदभाव आणि विषमता यांच्या प्रभावामुळे त्या चुका घडल्या.
ट्रान्साटलांटिक गुलामांच्या व्यापारामुळे लाखो आफ्रिकी लोकांचे बळजबरीने समूळ उच्चाटन झाले. मूळ अमेरिकी रहिवाशांचे झालेले विस्थापन, भारतातील जातीय भेदभाव, भारतातील स्थानिक आदिवासी समुदाय, महिलांवरील होणारे अत्याचार, एलजीबीटीक्यूआय व्यक्ती आणि इतर अल्पसंख्याक समुदाय यांच्यावरील भीषण अन्याय या गोष्टींनी इतिहासाची पाने डागाळली आहेत, असेही चंद्रचूड यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
सरन्यायाधीश म्हणाले...
कायदेशीर चौकटीचा वापर पद्धतशीरपणे काही समुदायांवर अत्याचार करणे आणि त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे करण्यात आला आहे. ऐतिहासिक चुका एक सामाजिक प्रणाली निर्माण करून अन्याय कायम ठेवतात. त्यातून समाजात हिंसाचाराचा भडका उडू शकतो. उपेक्षित आणि अल्पसंख्याक समुदायांना महत्त्वाचे स्थान देण्याचा निर्णय हा केवळ कागदावरच राहू नये, तर त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.