Julian Assange : महासत्तेला हादरा देणारा माणूस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 12:28 PM2024-07-07T12:28:25+5:302024-07-07T12:29:08+5:30

जगाची पोलिस असलेल्या अमेरिकेसारख्या सर्वशक्तिमान महासत्तेची पोलिस यंत्रणा ज्याच्या मागे हात धुऊन लागली होती, त्या ज्युलियन असांजची अखेरीस गेल्या आठवड्यात सुटका करण्यात आली. पाच वर्षे हा अवलिया गजाआड होता. त्याच्याविषयी...

Julian Assange the man who shook the superpowers | Julian Assange : महासत्तेला हादरा देणारा माणूस

Julian Assange : महासत्तेला हादरा देणारा माणूस

विनय उपासनी
मुख्य उपसंपादक, मुंबई 

माय नेम इज बॉण्ड... जेम्स बॉण्ड... ७० एमएमच्या स्क्रीनवर जेम्स बॉण्डचं कॅरेक्टर आपल्यासमोर ऐटीत उभे राहते आणि आपण पुढचे दीड-दोन तास त्याचे अचाट शक्तीचे प्रयोग पाहण्यात गुंग होऊन जातो. शत्रूचा नि:पात करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सर्व क्लृप्त्या हा हिरो वापरतो. शत्रूच्या गंडस्थळावर हल्ला करण्याचे काम असो वा त्याची गोपनीय कागदपत्रे पळवण्याची कामगिरी असो जेम्सचे काम फत्तेच... ज्युलियन असांजचे कामही याच धाटणीचे होते. 

विकिलिक्सचा एडिटर-इन-चीफ असलेल्या असांजने २०१० मध्ये इराक तसेच अफगाणिस्तान युद्धाविषयीची लाखो गोपनीय कागदपत्रे विकिलिक्सवर सादर करत अमेरिकेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली होती. त्यामुळे अमेरिकी यंत्रणा त्याच्यावर खार खाऊन होत्या. असांजला पकडण्यासाठी, त्याची कोंडी करण्यासाठी अमेरिकी पोलिस जंग जंग पछाडत होते. हेरगिरीच्या आरोपाखाली असांजला लंडनमध्ये अटक करण्यात आली. आणि आता अमेरिकेशी करार केल्यानंतर पाच वर्षांनी तो अमेरिकेत परतला आहे. तेथे त्याच्यावरील पुढील कारवाई चालेल. 

वस्तुतः पत्रकारिता आणि ज्युलियनचा काहीएक संबंध नाही. फिजिक्स आणि मॅथ्सचा हा पदवीधर (मात्र, पदवी घेतलीच नसल्याचा त्याचा दावा आहे) मूळचा ऑस्ट्रेलियाचा. लहानपणापासूनच अस्थिर असणारा ज्युलियन १९८७ मध्ये घराबाहेर पडला. तत्पूवीच तो ऑस्ट्रेलियातील हॅकर ग्रुपचा सदस्य बनला होता. कॉम्प्युटर हॅकिंगचा छंदच जडलेला त्याला. १९९२ मध्ये ज्युलियनवर हॅकिंगचे २४ गुन्हे होते. सिडनी कोर्टाने त्याला दोषीही ठरवले. मात्र, वय लक्षात घेऊन २१०० डॉलरच्या जामिनावर मुक्त केले. त्यानंतर ज्युलियनने कॉम्प्युटर क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. १९९४ पासून त्याने कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम सुरू केले. हॅकिंग कसे करावे, याचा वस्तुपाठ देणाऱ्या ‘अंडरग्राउंड : टेल्स ऑफ हॅकिंग’ या पुस्तकाच्या लिखाणातही ज्युलियनने महत्त्वाची भूमिका वठवली. त्यामुळे तर हॅकिंगच्या जगतात त्याचे नाव ‘आदराने’ घेतले जाऊ लागले. वादळी काहीतरी करायचे असे ठरवून ज्युलियनने २००६ मध्ये विकिलिक्सची स्थापना केली. मात्र, स्वत:ला संस्थापक म्हणणे त्याला पटत नाही, म्हणूनच ‘एडिटर-इन-चीफ’ असे बिरूद तो नावापुढे लावायचा आग्रह धरतो. 

‘जेम्स बाॅण्ड’ अमेरिकेत परतला, पुढे काय?

गोपनीय कागदपत्रे जमवायची आणि प्रसिद्ध करायची असा नवाच कल विकिलिक्सने आणला. वर्षभरातच विकिलिक्सकडे जगभरातील दहा लाख गोपनीय कागदपत्रे जमली. 

उत्साही ज्युलियनने मग थेट अमेरिकेवर लक्ष केंद्रित केले. पुढचा सारा इतिहास ज्ञात आहे. असा हा पत्रकारितेतील जेम्स बॉण्ड आता अमेरिकेत परतला आहे. त्याच्या पुढील वाटचालीवर जगाचे लक्ष असेलच...

Web Title: Julian Assange the man who shook the superpowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.