ज्युनो यान पोहोचले गुरूच्या कक्षेत!
By Admin | Published: July 6, 2016 02:12 AM2016-07-06T02:12:36+5:302016-07-06T02:12:36+5:30
अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेल्या ज्युनो या अंतराळयानाने गेल्या पाच वर्षांत २.७ अब्ज किमीचा खडतर प्रवास करून आपल्या सूर्यमालेतील पाचव्या आणि
केप कॅनव्हेराल : अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेल्या ज्युनो या अंतराळयानाने गेल्या पाच वर्षांत २.७ अब्ज किमीचा खडतर प्रवास करून आपल्या सूर्यमालेतील पाचव्या आणि सर्वात मोठ्या गुरु ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. ज्युनो पुढील २० महिने गुरुभोवती प्रदक्षिणा करत असताना त्यातील वैज्ञानिक उपकरणे जी बहुमोल माहिती गोळा करतील त्यातून वायूरूप गोळा असलेल्या या ग्रहाची आणि पर्यायाने सूर्यमालेच्या निर्मितीची गुपिते उलगडणे सोपे जाईल, अशी वैज्ञानिकांना आशा आहे.
अमेरिकेच्या पूर्व किनारी प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री ११.५३ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी ९.२३) ज्युनोने गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल्याचा रेडिओ संदेश आला तेव्हा कॅलिफोर्नियातील पसाडेना येथील जे
प्रॉपेल्शन लॅबोरेटरीमधील नियंत्रण कक्षात सचिंत मनाने श्वास रोखून बसलेल्या ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी आनंदाचे चित्कार करून व टाळ््या वाजवून जल्लोश केला.
जल्लोश करण्याचे कारणही तसेच होते. आकाराने पृथ्वीहून १३०० पट मोठ्या असलेल्या गुरुची प्रचंड शक्तिशाली गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून आत प्रवेश करण्यासाठी ज्युनो यानाने ताशी १.३० लाख मैल एवढा वेग गाठणे गरजेचे होते. ३५ मिनिटे इंजिन चालविल्यावर एवढा वेग गाठला गेला व काम फत्ते झाले. दुसरे महत्त्वाचे काम होते ते प्रवेशासाठी अचूक जागा निवडण्याचे. ६५ चंद्रांवरून असंख्य खगोलिय कणांचा गुरुवर सतत वर्षाव सुरु असतो. एवढ्या वेगाने जाणाऱ्या यानावर यापैकी एक कण जरी आदळला असता तरी ज्युनो नष्ट झाले असते. अशी कोणतीही विनाशक टक्कर न होता ज्युनोने कक्षत प्रवेश करणे ही मोठी उपलब्धी होती.
सर्वात दूरवरचा प्रवास...
- ज्युनो यानाने केलेला १.७ अब्ज किमीचा प्रवास हा सौरऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही अंतराळ यानाने केलेला सर्वात दूरवरचा प्रवास आहे.
- गुरु ग्रहावर पृथ्वीच्या तुलनेत २५ पट कमी सूर्यप्रकाश पोहोचतो. तेवढ्यावरही यानातील उपकरणे, इंजिन व यंत्रे चालविण्यासाठ लागणारी ५०० वॉट वीज मिळविण्यासाठी ज्युनोला तीन महाकाय सौरपंख बसविलेले आहेत.
या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा हेतू ...
1) गुरु ग्रह हा वरकरणी दिसतो तसा फक्त हायड्रोडन व हेलियमचा महाकाय गोळा आहे की त्याचा गर्भ पृथ्वीसारखा कठीण आहे? गुरुच्या ध्रुवप्रदेशांभोवती अतिनील प्रकाशाची जी प्रभा दिसते ती कशामुळे? मुख्य म्हणजे गुरु ग्रहावर कोणत्याही स्वरूपात पाणी आहे का? पाण्याचा हा शोध मंगळाप्रमाणे संभाव्य सजीवसृष्टीचा संकेत म्हणू नव्हे तर गुरुची जन्मकहाणी जाणून घेण्यासाठी असेल.
2) गुरुवर पाणी आढळले तर त्यावरून एका वैज्ञानिक सिद्धांताचा पाठपुरावा करण्यास आधार मिळेल. गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सूयार्नंतरचा आकाराने सर्वात मोठा खगोलीय गोल आहे. त्याचे वस्तुमान सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या वस्तुमानाहून दुप्पटीने जास्त आहे. गुरुची सूर्याभोवती प्रदक्षिणेची कक्षा पृथ्वीच्या तुलनेत पाचपट लांबवरून आहे.
3) त्यामुळे गुरुवर पाणी आढळले तर असा तर्क मांडता येईल की कदाचित या ग्रहाचा जन्म बऱ्याच नंतर झाला असावा व तो आता आहे त्याहून दूरवरच्या स्थानावरून इतर ग्रहांना ढकलत सध्याच्या स्थानावर आला असावा. याच अनुषंगाने कालमानात आणखी मागे
जाऊन सूर्यमालेच्या जन्माचे नेमके चित्र स्पष्ट करण्यासही मदत होईल.
गुरूच्या अगदी जवळ जाणार...
मानवाने गुरु ग्रहाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी विविध प्रकारच्या अंतराळ मोहिमा १९७५ पासून सुरु केल्या. याआधी नासाचे गॅलिलिओ यान गुरु ग्रहाच्या कक्षेत जाऊन आठ वर्षे तेथे
राहिले होते.
गॅलिलिओने युरोपा, गेनीमेड आणि कॅलिस्टो या गुरुच्या तीन चंद्रांच्या पृष्ठभागाखाली खाऱ्यापाण्याचे साठे असल्याचे पुरावे शोधले होते. ज्युनो हे यान गुरुच्या ढगांच्या आवरणापासून ३,१०० मैल एवढे जवळ जाईल.